कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या आवारात गांजा विक्रीत वाढ; कारवाईकडे दुर्लक्ष | पुढारी

कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या आवारात गांजा विक्रीत वाढ; कारवाईकडे दुर्लक्ष

कुरुंदवाड, पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोकाट गांजा व्यवसाय सुरु आहे. त्यांमुळे शहरात गांजाचा मुक्त व्यापार होत आहे. याला आळा घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे गांजा आणि गांजाचे व्यसन करणाऱ्यांचे प्रमाण  दिवसेंदिवस वाढले आहे. यामध्ये युवकांची आणि अल्पवयीन मुलांची संख्या मोठी आहे. नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. याकडे पोलिस प्रशासन देखील कारवाई करण्याकडे कानाडोळा करत आहेत.

दरम्यान शहरात पानटपरी, भाजीपाला छपऱ्यातील पैशाच्या पेट्या फोडून चोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे. (बुधवारी दि.5) भालचंद्र थिएटर चौकातील मोडू बागवान यांची पान-टपरी फोडून चोरी झाली आहे. हा प्रकार गांजा ओढणारे गांजेडी करत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. कुरुंदवाड परिसरात गेल्या दीड वर्षापासून कर्नाटक राज्य, इचलकरंजी या भागातून गांजा पुरवठा करणारी मोठी टोळी कार्यरत आहे. गांजा पुरवठा करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर देखील केला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. शहरात गांजाची मुळे खोलवर गेली आहेत. कुरुंवाडात गांजाची एकेक ग्रॅमने विक्री केली जात आहे. तंबाखूमधून गांजा ओढल्यानंतर दिवसभर नशा राहत आहे. तसेच सहजपणे गांजा मिळत असल्याने अनेक युवक नशेसाठी गांजा ओढतात.

शहरातील लिलाव होणाऱ्या भाजीपाला मार्केट मधील भाजीपाल्याच्या ओट्याखाली, तबक उद्यान गॅलरीत, स्मशानभूमी, नदीकाठी, माळ-भाग येथील बगिजा,बस्तवाड रस्त्यावरील जॅकवेलच्या खाली युवक गांजा ओढत बसलेले असतात. या परिसरातील शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांच्यात भीतीचे सावट आहे. नशा केल्यानंतर गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र आहे.

कुरुंदवाड व परिसरातील  शाळकरी मुले गांजा ओढण्याच्या व्यसनात गुरफटली आहेत.गांजा विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करून जेलची हवा खायला लावल्यास याला आळा बसू शकतो. दिखावा न करता कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र कुरुंदवाड पोलिस प्रशासन याबाबत गंभीर होणार का असा प्रश्न आहे.

हेही वाचा :

Back to top button