औरंगाबाद: प्रतिष्ठापना केलेल्या ‘त्या’ तीन गणरायांचे विसर्जन नाही | पुढारी

औरंगाबाद: प्रतिष्ठापना केलेल्या ‘त्या’ तीन गणरायांचे विसर्जन नाही

औरंगाबाद; राहुल जांगडे: दरवर्षी गणेशोत्सवात गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना केलेल्या बाप्पांना अनंत चतुर्थीच्या दिवशी निरोप दिला जातो. परंतु औरंगाबादेत तीन गणपती असे आहेत. जे एकदा बसले, ते पुन्हा उठलेच नाहीत. अनेक वर्षे होत आली तरी या भव्यदिव्य गणेशमूर्ती जागच्या हललेल्या नाहीत. प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी आजही या गणेशमूर्ती विराजमान असून भाविकांची अपार श्रद्धा, भक्तीमुळे मंडळाच्या तिन्ही गणरायांना मंदिराचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

कुँवार फल्ली येथील नवसाला पावणारा गणेश

कुँवार फल्ली येथील जागृत गणेश मंडळाचा नवसाला पावणारा श्री गणेश अग्रस्थानी आहे. मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पिंपळे म्हणाले की, १९८१ साली मंडळासाठी मूर्तीकार रतनकुमार बगलीये यांनी बाप्पाची ही आकर्षक मूर्ती साकारली. त्यावेळी स्थापनेच्या दिवशी ही मूर्ती जागेवरून हलतच नसल्याने राजूरच्या गणपतीला नवस करावा लागला होता. आज ४३ वर्षे झाली मंडळाने स्थापन केलेल्या ठिकाणीच ही मूर्ती विराजमान आहे. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून सर्वदूर ख्याती आहे. नवस पूर्ण झाल्यावर भाविकांनी डोक्याच्या मुकुटापासून तर पायाच्या कड्यापर्यंत सर्वच प्रकारचे दागिने अर्पण केले आहेत. यंदा चांदीचा मोदकही बाप्पा चरणी भक्ताने अर्पण केल्याचे कृष्णा पिंपळे यांनी सांगितले.

दिवानदेवडी येथील पावन गणेश

दिवानदेवडी येथे १९९२ साली पावन गणेश मंडळाने सुमारे २१ फूट उंचीची भव्य गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या गणेशमूर्तीचे विशाल स्वरुप व मोहक रुपाने भाविकांना विशेष आकर्षण जडले. त्यावेळी गणेशोत्सवाच्या दहा दिवसानंतर अनंत चतुर्थीला या मूर्तीचे विसर्जन करण्यास मंडळातील एकाही सदस्यांचे मन होत नव्हते. त्यामुळे श्री गणेश मूर्तीची या ठिकाणी कायमस्वरुपी स्थापना करण्यात आली. असे मंडळाचे अध्यक्ष प्रमोद नरवडे पाटील यांनी सांगितले. तीस वर्षांपासून ही गणेशमूर्ती स्थापना केलेल्या जागीच आहे.

चौराहा येथील श्री सिद्धीविनायक गणेश

९९४ मध्ये गणेशोत्सवात श्री सिद्धीविनायक गणेश मंडळाने २१ फूट उंचीची भव्य अशा गणेशमूर्तीची स्थापना केली होती. तेव्हापासून ही विशाल मूर्ती या भागाची ओळख बनली आहे. मंदिराचे कोषाध्यक्ष राजेंद्रसिंग ठाकूर यांच्यावतीने त्यांचे चिरंजीव सागर ठाकूर म्हणाले, शहरातील सर्वांत उंच गणेशमूर्ती आहे. काही महिन्यांपूर्वीच मूर्तीला मुकुट चढविण्यात आल्याने याची उंची २३ फूट झाली आहे. या भव्य मूर्तीचे डोळे कोरलेले असल्याने जिवंतपणा आला आहे. स्वत: बाप्पाची कृपादृष्टी आपल्यावर असल्याचे भक्तांना वाटते. हे वैशिष्टये असल्याचेही ठाकूर म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button