जळगाव : चारचाकी वाहनाने धडक दिल्याने क्षयरोग अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू | पुढारी

जळगाव : चारचाकी वाहनाने धडक दिल्याने क्षयरोग अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे नासिक विभागाचे क्षयरोग अधिकारी जळगावला बैठकीसाठी आले होते. जेवण झाल्यानंतर रात्री मित्राला भेटून परत हॉटेलकडे जात असताना भरधाव येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी रामानंद परिसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नाशिक विभागाचे क्षयरोग अधिकारी गोरवले रोड, पोर्तूगीज चर्चजवळ, मुंबई येथील हर्षद भाऊराव लांडे (वय-४३ ) हे डब्ल्यूएचओच्या एका महत्वाच्या बैठकीसाठी नाशिक येथे आले होते. त्यांच्याबरोबरच त्यांची टिम सुद्धा आली होती. ते जळगाव शहरातील हॉटेल मिनर्वा येथे उतरले होते. बुधवार (दि. ८) रोजी दिवसभर त्यांनी मिटींगला हजेरी लावली. बैठक आटोपल्यानंतर त्यांनी जेवण केले. त्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास ते हॉटेल रॉयल पॅलेस येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते. भेटून परत जात असताना रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाने  त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरीकांनी धाव घेत तत्काळ खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी हर्षद लांडे यांना मयत घोषीत केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुरुवार (दि. ९) रोजी घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Back to top button