औरंगाबाद : आजींनी शाळेत सादर केल्या जात्यावरील ओव्या | पुढारी

औरंगाबाद : आजींनी शाळेत सादर केल्या जात्यावरील ओव्या

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळांमध्ये मराठीची श्रीमंती हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. कोरोनामुळे या उपक्रमाला खंड पडला होता. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सुरळितपणे शाळा सुरू झाल्या असल्याने हा उपक्रम गारखेडा बीटमधील शाळांमध्ये पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

हा उपक्रम बीटातील ५० ते ५२ शाळांमध्ये राबविला जात आहे. दर सोमवारी विद्यार्थ्यांना साहित्य प्रकारातील एक विषय देण्यात येतो. त्याबाबत पालकांकडून माहिती घेत त्याबाबतचे सादरीकरण विद्यार्थी तसेच पालक शाळेत येऊन दर शुक्रवारी करतात. ऱ्हास पावत चाललेल्या व अलिखित असणाऱ्या ओवी या साहित्य प्रकाराचे सादरीकरण आजी, काकू, मावशी तसेच विद्यार्थ्यांच्या आईंनी शाळेत येऊन केले. विशेष म्हणजे यावेळी जात्यावर धान्य दळत या ओवींची सादरीकरण केल्याने एक वेगळेच वातावरण शाळेत तयार झाले होते. याआधी साहित्य प्रकारातील अभंग, भारूड, कविता यासारखे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. त्यातही विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

सरकारी शाळेविषयक जागृती

डोंगऱ्याच्या पायथ्याला आहे, माझी ही गं शाळा.. तू शाळेत पाठव बाळा…. अशी सरकारी शाळेविषयक माहिती देणारी तसेच या शाळांमध्ये चालणाऱ्या उपक्रमांविषयक माहिती देणारी ओवी कचनेर येथील शिक्षका प्रणिता चेरेकर यांनी सादर केली. कचनेर तांडा पाच येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी जात्यावरच्या ओव्या पालकांनी सादर केल्या. या भागात बंजारा समाजातील महिलांनी बंजारा भाषेतून ओव्या जात्यावर सादर केल्या. त्यांचा हा उत्साह पाहून शाळेतील शिक्षिका चेरेकर यांनी ओवी तयार करून विद्यार्थिनींसमवेत जात्यावर धान्य दळत सादर केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button