सोलापूर : अपत्य होत नाही म्हणून विवाहितेचा छळ, सासरवासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या | पुढारी

सोलापूर : अपत्य होत नाही म्हणून विवाहितेचा छळ, सासरवासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

मोहोळ, पुढारी वृत्तसेवा : मुलबाळ होत नाही म्हणून सासरच्या लोकांनी केलेल्या जाचाला कंटाळून ३० वर्षीय विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. अनिता ब्रह्मदेव घाटुळे (रा. कोन्हेरी ता. मोहोळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना ९ जून रोजी रात्री साडेआठ वाजता मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी गावात घडली. या प्रकरणी पोलिसांत पती, सासू व दीर यांच्या विरोधात १० जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ब्रम्हदेव पांडुरंग घाटुळे, शिवाजी पांडुरंग घाटुळे, सुमन पांडुरंग घाटुळे (सर्व रा. कोन्हेरी ता मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अनिता घाटुळे व ब्रम्हदेव घाटुळे यांचा विवाह २००८ मध्ये झाला आहे. लग्नानंतर काही महिने अनिता हिस सासरच्या लोकांनी व्यवस्थित नांदवले. त्यानंतर तुला मूलबाळ होत नाही असे, म्हणून सासरचे लोक भांडण तंटा करु लागले. त्यामुळे काही दिवस अनिता ही आपल्या माहेरी मोरवंची येथे राहण्यास आली होती. तिच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांची समजूत काढल्यानंतर ते तिला नांदायला घेऊन गेले होते. तरी देखील अनिताचा पती ब्रम्हदेव घाटुळे हा माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावायचा, तर सासू सुमन व दीर शिवाजी हे तिला बारीकसारीक गोष्टीवरून त्रास देऊन टोमणे मारायचे.

दरम्यान, सासरच्या लोकांचा जाचहाट असह्य झाल्याने ९ जून रोजी रात्री साडेआठ वाजता अनिताने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी मयत अनिताचा भाऊ सागर शंकर फाटे (रा. मोरवंची ता. मोहोळ) याने शुक्रवार १० जून रोजी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार वरील तिघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत.

हेही वाचलतं का?

Back to top button