ठाणे महापालिका निवडणूक : महिला आरक्षण जाहीर; खुल्या गटासाठी १७ जागा राखीव | पुढारी

ठाणे महापालिका निवडणूक : महिला आरक्षण जाहीर; खुल्या गटासाठी १७ जागा राखीव

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.३१) महिलांसाठीचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ५, अनुसूचित जमातीसाठी २ तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी १७ जागा राखीव झाल्या आहेत. पालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात चिट्ठी काढून ही सोडत जाहीर करण्यात आली. अनुसूचित जाती, जमाती तसेच सर्वसाधारण महिला खुला वर्ग असे मिळून एकूण ४७ प्रभागांमधून २४ प्रभागांमध्ये प्रत्येकी २ महिला निवडून जाणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये या आरक्षणामुळे दिग्गजांना कुठेही फटका बसलेला नाही.

ठाणे महापालिकेने आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली चिठ्ठ्या काढून हे आरक्षण जाहीर करण्यात आले. ही निवडणूक तीन सदस्यीय पॅनलपद्धतीने होणार असून १४२ नगरसेवक निवडून जाणार आहेत. ५० टक्के आरक्षणानुसार ७१ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. तर एकूण जागांपैकी अनुसूचित जातींसाठी १०, अनुसूचित जमातीसाठी ३ जागा राखीव आहेत. त्यातील महिलांच्या अनुसूचित जातींसाठी ५ व जमातींसाठी २ जागांचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात आरक्षण सोडत काढण्यात आली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार असल्याने हा ‘कोटा’ सर्वसाधारण गटामध्ये वळवण्यात आला आहे. तर तिसऱ्या टप्यात महिलांच्या १७ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.

अनुसूचित जातींचे आरक्षण

निवडणूक आयोगाने अनूसुचित जातींसाठी ३, १०, १२, १५, २३, २४, २७, २९, ३४ आणि ३४ या प्रभागातील ‘अ’ जागा आरक्षित केल्या होत्या. त्यापैकी ३, १२, १५, २३ आणि २९ प्रभागातील ‘अ’ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

अनुसूचित जमातींचे आरक्षण

अनुसूचित जमातीसाठी ५ अ, ६ अ आणि २९ ब हे प्रभाग निवडणूक आयोगोने थेट आरक्षित केले होते. त्यापैकी ५ अ आणि २९ ब हे दोन प्रभाग अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाले आहेत.

महिलांचा खुला प्रवर्ग

१४२ पैकी ७१ जागांवर महिला निवडून येणार आहेत. ६४ जागा महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४७ जागा थेट राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. सर्वसाधारण महिलांकरिता ब वर्गाच्या १७ जागांसाठी चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक १, २, १३, १६, १८, २०, २१, २५, २६, २९, ३२, ३६, ३९, ४१, ४३, ४५, ४६, ४७ हे प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४२ सह एकूण १८ प्रभागांमध्ये सर्वसाधरण प्रवर्गातील दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. तर अनु. जाती, जमाती प्रवर्गासह ६ प्रभागांमध्ये दोन नगरसेविका निवडून येणार आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button