ICC Rankings : शिवम दुबेची 414 स्थानांची मोठी झेप! यशस्वी जैस्वालचा टॉप-10 मध्ये समावेश | पुढारी

ICC Rankings : शिवम दुबेची 414 स्थानांची मोठी झेप! यशस्वी जैस्वालचा टॉप-10 मध्ये समावेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Rankings : आयसीसीने बुधवारी (17 जानेवारी) खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. यात भारताचे युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे तसेच अष्टपैलू अक्षर पटेल यांना मोठा फायदा झाला आहे. यशस्वीने फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये एन्ट्री घेतली आहे. तर शिवमने तब्बल 414 स्थानांची मोठी झेप घेत 58 व्या क्रमांकावर आला आहे. त्याचवेळी अक्षर पटेल यालाही 12 स्थानांचा फायदा झाला असून तो गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये पोहचला आहे.

सध्या टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. मालिकेतील दोन सामने भारताने जिंकले आहेत. या दोन्ही सामन्यात शिवम दुबेने अर्धशतकी खेळी साकारली. मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 40 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या, ज्यात त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि दोन भिडणारे षटकार आले. यानंतर दुसऱ्या सामन्यात तो इंदूरमध्ये खेळायला आला तेव्हा त्याने पुन्हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि 32 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. यावेळी त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. विशेष म्हणजे तो दोन्ही डावात एकदाही बाद झाला नाही. एवढेच नाही तर त्याने विकेट्सही घेतल्या. पहिल्या सामन्यात त्याने 9 धावांत एक आणि दुसऱ्या सामन्यात 36 धावांत 1 बळी घेतला. (ICC Rankings)

अक्षर पटेल टॉप 5 गोलंदाजांमध्ये

दुसरीकडे अक्षर पटेलने चेंडूच्या माध्यमातून आपली उपयुक्तता सिद्ध केली. तो या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने मोहाली आणि इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांत 4 विकेट घेतल्या आहेत. ज्यामुळे तो गोलंदाजी क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचला. या यादीत इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीद अव्वल स्थानी, तर वेस्ट इंडिजचा अकील हुसेन दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या रवी बिश्नोईची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे.

सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी कायम

दरम्यान, या मालिकेतील पहिल्या सामन्यात यशस्वी खेळू शकला नव्हता. त्याने दुसऱ्या टी20 मधून पुनरागमन केले आणि इंदूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने 68 धावांची धमाकेदार खेळी खेळली. त्याने सात स्थानांनी झेप घेत थेट सहावे स्थान गाठले आहे. त्याच्या खात्यात 739 रेटिंग जमा झाले आहेत. भारताचे तीन फलंदाज आता टॉप-10 मध्ये आहेत. स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव 869 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत सूर्या खेळत नसला तरी तो अव्वल स्थानावर कायम आहे. (ICC Rankings)

इंग्लंडचा फलंदाज फिल सॉल्ट दुस-या स्थानी

इंग्लंडचा फलंदाज फिल सॉल्ट (802) दुसऱ्या, पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (775) तिसऱ्या स्थानी आहेत. तर चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (763) आहे. त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली. मात्र, यंदाच्या क्रमवारीत त्याला तिसऱ्या अर्धशतकाचा लाभ मिळालेला नाही. त्याचे गुण पुढील वेळी त्याच्या खात्यात जमा होतील. द. आफ्रिकेच्या एडन मार्करामला एका स्थानाचे नुकसान झाले असून तो 755 रेटिंगसह पाचव्या स्थानावर घसरला आहे.

ऋतुराज गायकवाडचे नुकसान (ICC Rankings)

यशस्वी क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा रिले रुसो (689) सातव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाड यांना प्रत्येकी एका स्थानाचे नुकसान झाले आहे. बटलर 680 रेटिंगसह आठव्या स्थानावर तर गायकवाड 661 रेटिंगसह नवव्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या रीझा हेंड्रिक्सचे 660 रेटिंग असून तो 10 व्या क्रमांकावर आहे.

Back to top button