NZ vs PAK T20 : पाकिस्तानचा सुपडासाफ! न्यूझीलंडचा टी-20 मालिकेवर कब्जा | पुढारी

NZ vs PAK T20 : पाकिस्तानचा सुपडासाफ! न्यूझीलंडचा टी-20 मालिकेवर कब्जा

पुढारी ऑनलाईन डेस्क : NZ vs PAK T20 : फिन ऍलनच्या वादळी शतकाच्या (137) बळावर न्यूझीलंडने बुधवारी तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचा 45 धावांनी पराभव केला. यासह यजमान किवी संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

ड्युनेडिनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पहिला गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या किवींची सुरुवात खराब झाली. 28 च्या एकूण धावसंख्येवर डेव्हॉन कॉनवे (7) हारिस रौफचा बळी ठरला. यानंतर ॲलनने टीम सेफर्टसह दुसऱ्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी रचली. मोहम्मद वसीमने सेफर्टला (31) आयुबकरवी झेलबाद करून ही भागीदारी मोडली. त्यानंतर आलेल्या डॅरिल मिशेलने निराशा केली. तो 8 धावा करून बाद झाला. नवाजने त्याची विकेट घेतली. (NZ vs PAK T20)

18व्या षटकात फिन ॲलनची शतकी खेळी संपुष्टात आली. जमान खानने त्याला बाद केले. पण तोपर्यंत ॲलनने आपले काम केले होते, त्याने 62 चेंडूत 16 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 137 धावांची स्फोटक खेळी खेळली. यानंतर मार्क चॅपमन (1), मिचेल सॅटनर (4), ग्लेन फिलिप्स (19) हे फटकेबाजीच्या नादात बाद झाले. अशाप्रकारे न्यूझीलंडने 20 षटकांत 7 गडी गमावून 224 धावा केल्या. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने सर्वाधिक दोन बळी घेतले. शाहीन आफ्रिदी, जमान खान, मोहम्मद नवाज आणि मोहम्मद वसीम यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

225 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामी जोडीला किवी गोलंदाजांनी स्थिरावण्याची संधी दिली नाही. टीम साऊदीने पाकला पहिला धक्का दिला. त्याने सॅम अय्युबला (10) फर्ग्युसनकरवी झेलबाद केले. येथून पुढे मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 50 धावांची भागिदारी केली. पण सँटनरने रिझवानला यष्टिरक्षक सेफर्टकडे झेलबाद करून पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. 62 धावांत 2 गडी गमावल्यानंतर बाबरने इतर फलंदाजांच्या साथीने सामना जिंकण्यासाठी धडपड केली. पण त्याला कोणाची साथ मिळाली नाही. फखर जमान (19)ला लोकी फर्ग्युसनने सॅन्टनरच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर आझम खान (10) मॅट हेन्रीचा बळी ठरला. इफ्तिखार अहमद धावबाद झाला. अखेर बाबर आझमही (58) अर्धशतक पूर्ण करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला ईश सोधीने ग्लेन फिलिप्सकरवी झेलबाद केले. (NZ vs PAK T20)

यानंतर मोहम्मद नवाजने (28) फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. साउदीने नवाजला यष्टिरक्षक सेफर्टकडे झेल देण्यास भाग पाडले. यासह पाकिस्तानची सातवी विकेट पडली. अशा प्रकारे पाकिस्तानला 20 षटकात 7 विकेट गमावून 179 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. न्यूझीलंडकडून साऊदीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. मॅट हेन्री, लोकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर आणि ईश सोधीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Back to top button