AUS vs WI Test : विंडिजच्या जोसेफने पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर रचला इतिहास, 85 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची केली बरोबरी | पुढारी

AUS vs WI Test : विंडिजच्या जोसेफने पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर रचला इतिहास, 85 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची केली बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs WI Test : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अॅडलेड ओव्हलवर खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा नवोदित वेगवान गोलंदाज शमर जोसेफने (shamar joseph) इतिहास रचला. त्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथला स्लिपमध्ये झेलबाद करून पहिल्या बळीची नोंद केली. तो कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा जगातील 23 वा तर वेस्ट इंडिजचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. जोसेफच्या आधी 1939 मध्ये विंडिजकडून पदार्पण करताना टायरेल जॉन्सन यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर वॉल्टर कीटन यांना बाद केले होते.

विंडिजचा पहिला डाव 188 धावांत संपुष्टात

नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला 62.1 षटकांत 188 धावांवर रोखले. त्यानंतर यजमानांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आपल्या पहिल्या डावात 2 विकेट गमावून 59 धावा केल्या.

कमिन्स-हेजलवूड यांचा बळींचा ‘चौकार’ (AUS vs WI Test)

कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपले सामर्थ्य दाखवले आणि विंडिजची फलंदाजी उद्ध्वस्त केली. कमिन्सने 17 षटके टाकली आणि 41 धावा देत 4 बळी घेतले. तर हेझलवूडने 15 षटकात 44 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स मिळवल्या. मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला. मिचेल मार्श आणि कॅमेरून ग्रीन यांना एकही विकेट घेता आली नाही.

11 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत जोसेफचा अनोखा विक्रम

दिवसाचा उत्कृष्ट क्षण वेस्ट इंडिजच्या नवोदित शमर जोसेफच्या (shamar joseph) नावे नोंदवला गेला. प्रथम त्याने 11व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरल्यानंतर अनपेक्षित कामगिरी करून दाखवली आणि संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये 36 (41 चेंडू) धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. यादरम्यान त्याने 1 षटकार आणि 3 चौकार ठोकले. 11व्या क्रमांकावरची ही सर्वात मोठी खेळी ठरली. याआधी देवेंद्र बिशूने 2011 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी पदार्पणात 11व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 67 चेंडूत 24 धावा केल्या होत्या. आता तो विक्रम जोसेफने मोडीत काढत आपल्या नावावर केला आहे.

पहिल्याच चेंडूवर स्मिथची शिकार (AUS vs WI Test)

फलंदाजीनंतर शमर जोसेफने (shamar joseph) आपल्या गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले. खरे तर ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत पहिल्यांदाच सलामीला उतरलेला स्टीव्ह स्मिथ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण कॅरेबियन कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने जोसेफकडे चेंडू सोपवला आणि स्मिथचा खेळ खल्लास झाला. जोसेफचा पहिला चेंडू स्मिथच्या बॅटची कड घेऊन दुसऱ्या स्लिपमध्ये गेला, जिथे जस्टिन ग्रीव्हजने कोणतीही चूक न करता झेल पकडला. याशिवाय जोसेफने मार्नस लॅबुशेनचीही विकेट घेतली. स्मिथ 12 तर लॅबुशेन 10 धावा करून माघारी परतले.

बॉडिगार्डचा झाला क्रिकेटर!

जोसेफ (shamar joseph) हा कावेम हॉज आणि जस्टिन ग्रीव्ह्जनंतर वेस्ट इंडिज संघात पदार्पण करणारा तिसरा गोलंदाज आहे. गेल्या वर्षी त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वेस्ट इंडिज अ संघाकडून खेळताना 12 विकेट घेतल्या होत्या. गयानामधील बारकारा गावातून आलेला जोसेफ दोन मुलांचा बाप असून त्याने आपल्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहासाठी बॉडिगार्डची नोकरी करायचा. पण क्रिकेट खेळण्याच्या वेडापायी तो अस्वस्थ व्हायचा. त्याचे नोकरीत मन रमत नव्हते. अखेर त्याने संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित करण्यासाठी बॉडिगार्डची नोकरीच सोडली आणि थेट क्रिकेटचे मैदान गाठले. त्यानंतर त्याने वयाच्या 23 व्या वर्षी एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून पदार्पण केले. ताशी 150 किमीच्या वेगाने चेंडू फेकणा-या या कॅरेबियन गोलंदाजाने विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगीरी नोंदवली. ज्याची दखल विंडिज क्रिकेट बोर्डाला घ्यावी लागली. परिणामी वर्षभरातच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली.

जोसेफ आंतरराष्ट्रीय लीग टी-20 मध्ये दुबई कॅपिटल्सकडूनही खेळतो. त्याची गोलंदाजी पाहून अनेकांना माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट्स, कर्टली अ‍ॅम्ब्रोस, मायकेल होल्डिंग अशा दिग्गज माजी वेस्ट इंडिज गोलंदाजांचा काळ आठवला, असे मत अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे.

Back to top button