बाबर आझमने कर्णधारपद सोडावे : शाहिद आफ्रिदी | पुढारी

बाबर आझमने कर्णधारपद सोडावे : शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मागील काही कालावधीपासून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम खराब फलंदाजीमुळे ट्रोल होत आहे. टी-20 क्रिकेटमधील बाबरचा स्ट्राईक रेट पाहून पाकिस्तानी संघाच्या माजी खेळाडूंनी देखील त्याच्यावर निशाणा साधला होता. अशातच पाकिस्तानचा माजी दिग्गज शाहिद आफ्रिदी याचे म्हणणे आहे की, बाबर आझमने कर्णधारपद सोडून मोकळेपणाने फलंदाजी करायला हवी. टी-20 विश्वचषक 2022च्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवानंतर आफ्रिदीने पाकिस्तानी कर्णधाराला हा सल्ला दिला आहे.

खरे तर बाबर आझमने टी-20 संघाचे नेतृत्व दुसर्‍याच्या हाती सोपवावे, अशी मागणी आफ्रिदीने केली आहे. पाकिस्तानमधील टीव्ही चॅनेलशी संवाद साधताना आफ्रिदीने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आफ्रिदीने तीन नवीन कर्णधारांची नावे जाहीर करताना म्हटले, ‘मला वाटते की टी-20 क्रिकेटसाठी एका नवीन चेहर्‍याला कर्णधार म्हणून संधी द्यायला हवी. मी बाबरचा खूप सन्मान करतो, एक खेळाडू म्हणून तो खूप चांगला आहे. मला हेच वाटते की बाबरने कमीत कमी दबावात खेळावे. त्याने कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व करावे, मात्र टी-20 संघाची जबाबदारी दुसर्‍याला सोपवावी. पाकिस्तानकडे नेतृत्व करणारे खेळाडू आहेत, यामध्ये शादाब खान, मोहम्मद रिझवान आणि शान मसूद अशा खेळाडूंचा समावेश आहे.

बाबरने स्वत: याबाबत निर्णय घ्यायला हवा. त्याचा तो निर्णय त्याच्या टी-20 मधील कर्णधारपदाबाबत असावा. मला वाटते की बाबरने त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रीत करावे. त्याने आगामी काळात कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व केले पाहिजे.’ अशा शब्दांत शाहिद आफ्रिदी याने बाबरला टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा…

Back to top button