नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर विभागात येत्या खरीप हंगामात कापूस, धान, सोयाबीन या परंपरागत पिकांसह तृणधान्य, कडधान्य, गळित धान्य क्षेत्रात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खतांचा पुरवठा होण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
यावर्षी सर्वाधिक लागवड कापूस, सोयाबीन आणि धान अशी असेल. भात पिकाचे उत्पादन क्षेत्र वाढणार आहे. धान पीक 95 हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाईल. यात 1 हजार 341 हेक्टर क्षेत्राची वाढ अपेक्षित आहे. याशिवाय सोयाबीन पिकासाठी 90 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित ठेवले असून सुमारे 3 हजार 529 हेक्टर क्षेत्राची यात वाढ अपेक्षित आहे. कापूस पिकासाठी 2 लाख 25 हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित केले असून यात सुमारे 3 हजार 781 हेक्टर एवढी वाढ अपेक्षित आहे. दरम्यान, तेल बियांवर भर देण्याच्या दृष्टीकोनातून जवस पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन व उत्पन्न हाती कसे घेता येईल. यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
शेतीतील नवनवीन प्रयोगाद्वारे साध्य झालेले बदल व वाढलेले उत्पादन हे प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय शेतकऱ्यांना त्याची अनुभूती घेता येणार नाही. येणारा काळ हा उपलब्ध नैसर्गिक संसाधनांच्या काटेकोर वापरातून अधिकाधिक उत्पादनाची हमी घेणारा कसा राहील, याकडे कृषी विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे. खरीप हंगामाला समोर जाताना शेतकऱ्यांच्या विश्वासाला अधिक दृढ करण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या व्यापक संवादाची, शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन, उपवन संरक्षक डॉ. भारतसिंग हाडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाप्पासाहेब नेमाणे, विभागीय कृषी सहसंचालक शंकर टोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, आत्माच्या प्रकल्प संचालिका अर्चना कडू, कृषी महाविद्यालयाचे प्रा. विनोद खडसे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण बियाण्यांच्या दृष्टीने सोयाबीन सारख्या बियाणांची उगवण क्षमता ही कोणत्याही शेतकऱ्यांना तपासता येऊ शकते. याबाबत अधिक जनजागृती झाल्यास शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जिल्ह्यातील खरीप हंगामाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
हेही वाचा