AUSvsENG ODI : वॉर्नर-स्मिथच्या ‘फिफ्टी’पुढे मलानचे ‘शतक’ फिके! पहिल्या वनडेत कांगारूंनी इंग्लंडला लोळवले

AUSvsENG ODI : वॉर्नर-स्मिथच्या ‘फिफ्टी’पुढे मलानचे ‘शतक’ फिके! पहिल्या वनडेत कांगारूंनी इंग्लंडला लोळवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUSvsENG ODI : डेव्हिड वॉर्नर (86) आणि स्टीव स्मिथच्या (80*) झंझावाती अर्शशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. टी-20 विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर यजमान संघाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली या मालिकेत चांगली सुरुवात केली आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळली ज्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आता कांगारू संघाने वनडे मालिकेत दमदार कामगिरी करत जोरदार पुनरागमन केले आहे. (AUSvsENG ODI australia beat england by 6 wickets in first odi)

टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लिश संघाच्या सलामीच्या जोडीला फारसे योगदान देता आले नाही. अवघ्या 18 धावसंख्येवर फिल सॉल्टची (6) विकेट पडली. यानंतर खराब फॉर्मशी झुंज देत असलेला जेसन रॉय (14) क्लिन बोल्ड झाला. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आलेले जेम्स व्हिन्स (5) आणि सॅम बिलिंग्ज (17) यांना काही खास प्रदर्शन करता आले नाही आणि ते तंबूत परतले. केवळ 66 धावांवर इंग्लंडचे 4 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यापैकी 2 विकेट कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सने घेतल्या. 66 धावांवर आपले प्रमुख फलंदाज गमावल्यामुळे इंग्लंडचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकणार नाही असे चित्र निर्माण झाले होते. पण डेव्हिड मलानने एक बाजू लावून धरली. त्याने पहिल्यांदा कर्णधार जोस बटलर 52 धावांची भागीदारी केली. संघाची धावसंख्या 118 असताना बटलर (29) बाद झाला. त्यानंतर मलानने रणनिती बदलून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने 128 चेंडूंचा सामना करत 134 धावांची शानदार खेळी केली. ज्यामध्ये 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याची विकेट 46 व्या षटकात पडली. त्यानंतर डेव्हिड विलीने 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत इंग्लंडची धावसंख्या 287 पर्यंत नेली. (AUSvsENG ODI australia beat england by 6 wickets in first odi)

288 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड या ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी सलामीच्या जोडीने कोणत्याही प्रकारची घाई दाखवली नाही. सुरुवातीला वेळ घेतल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर दिले. वॉर्नर-हेड जोडीने पहिल्या विकेटसाठी 19.2 षटकात 147 धावांची जबरदस्त भागीदारी करून इंग्लंडला बॅकफूटवर पाठवले. पण हेड (69)च्या रुपात कांगारूंची पहिली विकेट पडली. पण तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या स्टीव्ह स्मिथने पुन्हा इंग्लिश गोलंदाजांना अडचणीत आणले. वॉर्नरनेही दुसऱ्या टोकाकडून जोरदार फटकेबाजी सुरूच ठेवली, पण वेगाने धावा करण्याच्या नादात त्याला आपली विकेट गमवावी लागली. तो 86 धावा करून माघारी परतला. त्यानंतर अॅलेक्स कॅरी (21) आणि मार्नस लॅबुशेन (4) यांना झटपट बाद करून सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पण स्टीव्ह स्मिथने शेवटपर्यंत टिकून राहून ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. स्मिथने 9 चौकार, एक षटकाराच्या सहाय्याने 78 चेंडूत 80 धावा तडकावल्या. इंग्लंडच्या विलीला 2, तर जॉर्डन आणि डोसन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. (AUSvsENG ODI australia beat england by 6 wickets in first odi)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news