U23 World Wrestling C’Ship : भारताचा कुस्तीपटू ‘साजन’ने रचला इतिहास, २३ वर्षाखालील जागतिक स्पर्धेत पदकाला गवसणी | पुढारी

U23 World Wrestling C'Ship : भारताचा कुस्तीपटू ‘साजन’ने रचला इतिहास, २३ वर्षाखालील जागतिक स्पर्धेत पदकाला गवसणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : U23 World Wrestling C’Ship : भारतीय कुस्तीपटू साजन भानवाला याने स्पेनमध्ये सुरू असलेल्या अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. या जागतिक स्पर्धेत पदकाला गवसणी घालणारा तो भारताचा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू ठरला आहे. साजनने कांस्यपदकाच्या प्ले-ऑफ लढतीत युक्रेनच्या दिमित्रो वायसोत्स्कीचा पराभव केला. या अटीतटीच्या सामन्यात भारतीत कुस्तीपटूने पिछाडीवर पडूनही शानदार पुनरागमन करत युक्रेनच्या कुस्तीपटूला आस्मान दाखवले आणि विजयाची नोंद केली.

तत्पूर्वी, भानवालाने लिथुआनियाच्या एस्टिस एल याच्यावर 3-0 असा विजय मिळवला होता, परंतु उपउपांत्यपूर्व फेरीत मोल्दोव्हाच्या अलेक्झांड्रिन गुटूकडून त्याला पराभव पत्करावा लागला. गुटू अंतिम फेरीत पोहोचल्यावर त्याला रिपेचेजद्वारे पुन्हा पदक जिंकण्याची संधी मिळाली. यानंतर भानवाकाने रिपेचेजमध्ये कझाकिस्तानच्या रसूल झुनिसवर 9-6 ने मात केली. (u 23 world wrestling championship indian wrestler sajan bhanwala won medal)

दरम्यान, भारताचा आणखी एक कुस्तीपटू विकास 72 किलो वजनी गटात कांस्य पदकासाठी लढणार आहे. त्याला उपांत्य फेरीत क्रोएशियाच्या पावेल पुक्लावेककडून तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे पराभव पत्करावा लागला. आता त्याचा सामना जपानच्या जॉर्जिओस टी सोटीरियाडिस आणि डी कोबायाशी यांच्यातील रेपेचेज सामन्यातील विजेत्याशी होईल. विकासने यापूर्वी किर्गिस्तानच्या आदिलखान नुरलानबेकोव्ह आणि यजमान स्पेनच्या मार्कोस सँचेस सिल्वा यांचा पराभव केला होता. (u 23 world wrestling championship indian wrestler sajan bhanwala won medal)

सुमितने 60 किलो वजनी गटात पदकाच्या शर्यतीत पुनरागमन केले आहे. रेपेचाजमध्ये त्याचा सामना कझाकिस्तानच्या ओलजस सुलतानशी होणार आहे. 67 किलो वजनी गटात आशू पराभूत होऊन बाहेर पडला. भारताचे सहा ग्रीको-रोमन कुस्तीपटू, दोन महिला आणि एक फ्रीस्टाइल कुस्तीपटू येथे दाखल झाले आहेत. इतर 21 भारतीय कुस्तीपटूंचा व्हिसा स्पॅनिश दूतावासाने नाकारला होता. (u 23 world wrestling championship indian wrestler sajan bhanwala won medal)

Back to top button