पराभवाच्या भीतीने आढळरावांना निवडणूक लढवायला पुढे केले: रोहित पवारांचा दावा | पुढारी

पराभवाच्या भीतीने आढळरावांना निवडणूक लढवायला पुढे केले: रोहित पवारांचा दावा

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा पक्षातील एका बड्या नेत्याला शिरूरच्या जागेवर लढवायचे होते, मात्र शिरूर लोकसभेचा सर्व्हे समोर आला तेव्हा त्या सर्व्हेमध्ये असे दिसले की, खा. डॉ. अमोल कोल्हे ही निवडणूक तीन लाखांनी जिंकू शकतात; त्यामुळे त्यांनी बरीच शोधाशोध करूनही त्यांना कोणीच उमेदवार मिळाला नाही; म्हणून त्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुढे केले, असे आ. रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ते डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरूर येथील प्रचार सभेत बोलत होते.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पुणे ’म्हाडा’चे अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले होते, त्यामुळे ते ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नव्हते, असे आ. रोहित पवार म्हणाले. भाजपने अनेक नेत्यांना ’ईडी’ची भीती दाखवून पक्षात घेतलं,
नेत्यांनीही तुरुंगापेक्षा भाजप बरा असं म्हणत पक्ष प्रवेश केला, भाजपने महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्ष फोडण्यासाठी अनाजी पंताची नीती वापरली, हे आता सर्वसामान्य मतदारांच्या लक्षात आलं असल्याचे या वेळी आ. रोहित पवार म्हणाले.

दौंडच्या खासगी कारखान्यासाठी घोडगंगा बंद पाडला

दौंड तालुक्यातील एका खासगी कारखान्याला ऊस मिळावा म्हणून आ. अशोक पवारांच्या ताब्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना आर्थिक कोंडी करून जाणूनबुजून बंद पाडला असल्याचा आरोपही आ. रोहित पवारांनी या वेळी केला.

हेही वाचा

Back to top button