गोंदिया : ४.२३ कोटीचे धान सडण्याच्या मार्गावर; ६ हजार क्विंटल धानाला फुटले अंकुर | पुढारी

गोंदिया : ४.२३ कोटीचे धान सडण्याच्या मार्गावर; ६ हजार क्विंटल धानाला फुटले अंकुर

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शासनाकडून खरीप हंगामातील धानाची अद्यापही उचल करण्यात आली नाही. परिणामी, अनेक शासकीय धान खरेदी केंद्रांवरील धान उघड्यावर पडून आहे. त्यातच सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रामार्फत खरेदी करण्यात आलेले ४.२३ कोटी रुपये किमतीचे धान अवकाळी पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहे. यापैकी जवळपास ६ क्विंटल धानाला अंकुर फुटले आहे. त्यामुळे केंद्र चालकाचे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

राज्यात धानाचे कोठार म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात खरीप व रबी (ऊन्हाळी) दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. दरम्यान, शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन एजन्सीच्या माध्यमातून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत शेतकर्‍यांच्या धानाची खरेदी करण्यात येते. तर राईस मिलर्सकडून या धानाची भरडाईसाठी उचल करून शासनाला तांदळाचा पुरवठा करण्यात येत असते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून राईस मिलर्सच्या मागण्या प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील राईस मिलर्सनी भरडाईसाठी धानाची उचल केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल धान पडून आहे.

विशेष म्हणजे, आदिवासी विकास महामंडळाच्या अनेक केंद्रांवर गोदामाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या केंद्रांवरील धान ताटपत्रीच्या आधारे उघड्यावरच पडून आहे. तर आता अवकाळी पावसामुळे हे धान भिजत असल्याने अनेक केंद्रांवरील धान कुजत आहे. दरम्यान, आदिवासी विकास महामंडळंतर्गत येणाऱ्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रामार्फत सन २०२३-२४ या खरीप हंगामात परिसरातील पाच गावातील शेतकर्‍यांकडून ४ कोटी २३ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या १९ हजार ४१० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. मात्र, राईस मिलर्सकडून या धानाची उचल करण्यात आली नाही. त्यातच अवकाळी पावसामुळे हे धान भिजले असल्याने सडण्याच्या मार्गावर आहेत. तर यापैकी पावसात भिजल्याने जवळपास ६ हजार क्विंटल धानाला अंकुर फुटले आहे. त्यामुळे केंद्र चालकांना व शासनाला कोटी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

उन्हाळी धान ठेवणार कुठे ?

शासनाच्या मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाकडून शासकीय आधारभूत किमत धान खरेदी केंद्रांवर खरीपाच्या धानाची खरेदी करण्यात आली असताना अद्यापही या धानाची उचल करण्यात आलेली नाही. तर आता रबी हंगामातील उन्हाळी धान कापणी व मळणीला सुरुवात झाली असून काही दिवसात शेतकऱ्यांचे धान बाजारपेठेत येणार आहे. अशावेळी शासनाकडून उन्हाळी धान पिकाची खरेदी होणार का? खरेदी केल्यास धान कुठे ठेवणार? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

शेतकरी पुन्हा व्यापाऱ्यांच्या दारी !

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर खरिपाचे धान पडून असल्याने यंदा रब्बीची धान खरेदी वांद्यात येण्याची शक्यता आहे. तर आता रब्बीचे धान आले असताना या धानाच्या विक्रीचा प्रश्न शेतकर्‍यापुढे ठाकणार आहे. अशावेळी शेतकर्‍यांवर खासगी व्यापाऱ्यांकडे पडक्या भावात आपल्या शेतमालाची विक्री करण्याची वेळ येणार आहे.

हा दुर्लक्ष ‘त्याʼसाठी तर नाही…

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील लाखो क्विंटल धान सडण्याच्या मार्गावर असून शासनाकडून याकडे सस्पेशल दुर्लक्ष करण्यात येत आहे. तेव्हा हा शासनाचा दुर्लक्ष धानापासून दारू व धानाच्या कोंड्यापसून इथेनॉल तयार करण्यासाठी तर नाही? असा प्रश्न आता सर्वसामान्यांतून उपस्थित केले जात आहेत.

रब्बी हंगामात अडचण

नोव्हेंबर २०२३ मध्ये धान खरेदीला सुरुवात झाली असताना आतापर्यंत धानाची उचल झालेली नाही. तर धान ठेवण्याचे ओटे फुल्ल झाले असून पावसामुळे धान सडून नुकसान झाले आहे. त्यातच रब्बी हंगामातील धान खरेदी करण्यात अडचण येणार आहे.
– मनिष सोनवाने, सचिव, आदिवासी विविध कार्यकारी सेवा सह. संस्था, डव्वा

Back to top button