बॅडमिंटन स्पर्धा: उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाचे आव्हान संपुष्टात | पुढारी

बॅडमिंटन स्पर्धा: उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाचे आव्हान संपुष्टात

सुरत: पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या बॅडमिंटन संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. महाराष्ट्र आणि अग्रमानांकित तेलंगणा यांच्यातील उपांत्य लढत अतिशय अटीतटीची झाली. यात महाराष्ट्र संघ 2-3 अशा फरकाने पराभूत झाला.

थॉमस चषक संघातील चिराग शेट्टी, मालविका बनसोड असे दिग्गज खेळाडू महाराष्ट्र संघात असल्याने अंतिम फेरी गाठण्याची अपेक्षा महाराष्ट्रातील बॅडमिंटन चाहत्यांना होती. पहिल्या मिश्र दुहेरी सामन्यात चिराग शेट्टी आणि रितिका ठाकरे या जोडीने तेलंगणाच्या विष्णूवर्धन गौड व गायत्री गोपीचंद पुल्लेला या जोडीवर 21-13, 16-21, 21-15 असा विजय नोंदवत महाराष्ट्र संघाला विजयी सुरुवात करुन दिली.

दुसऱ्या गेममध्ये तेलंगणाच्या साई प्रणीथ बी. याने महाराष्ट्राच्या वरुण कपूरला 21-10, 21-14 असे सरळ दोन गेममध्ये नमवून 1-1 अशी बरोबरी संघाला साधून दिली. तिस-या महिला एकेरी लढतीत महाराष्ट्राच्या मालविका बनसोड हिने सामिया इमाद फारुकी हिचा चुरशीच्या झुंजीत 15- 21, 22-20, 21-6 असा पराभव करुन सामन्यातील चुरस वाढवली. पहिला गेम गमावल्यानंतर मालविका बनसोड हिने शानदार खेळ करुन संघाचे सामन्यातील आव्हान कायम ठेवले.

दुहेरी लढतीत तेलंगणाच्या सुमेथ रेड्डी बी. व विष्णूवर्धन गौड या जोडीने महाराष्ट्राच्या विप्लव कुवळे व चिराग शेट्टी या जोडीचा अटीतटीच्या लढतीत 18-21, 21-19, 23-21 अशा फरकाने पराभव करुन सामन्यातील रोमांच वाढवला. विप्लव व चिराग या जोडीने पहिला गेम 21-18 असा जिंकला होता. पण नंतरचे अटीतटीचे झालेले दोन्ही गेम त्यांनी गमावले. पाचव्या निर्णायक लढतीत तेलंगणाच्या सिक्की रेड्डी एन. आणि गायत्री गोपीचंद पुल्लेला या जोडीने महाराष्ट्राच्या सिमरन सिंघी व रितिका ठाकरे या जोडीवर 21-9, 21-16 असा सहज विजय साकारत अंतिम फेरी गाठली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button