IND vs AUS T20 : मालिका कोण जिंकणार? | पुढारी

IND vs AUS T20 : मालिका कोण जिंकणार?

हैदराबाद, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS T20) यांच्यातील तिसरा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना हैदराबाद येथे रविवारी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाचे लक्ष आपले दोन प्रमुख गोलंदाज हर्षल पटेल आणि यजुवेंद्र चहल यांच्या कामगिरीवर असणार आहे. भारताने नागपुरात सहा विकेटस्नी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली असली तरी त्यांच्यासाठी गोलंदाजी विभाग आणि त्यात विशेषकरून हर्षल पटेल आणि चहलच्या फॉर्मची चिंता आहे. वर्ल्डकपपूर्वी हे दोघे फॉर्मात येणे भारतासाठी गरजेचे आहे.

भारताचा स्टार पेसर जसप्रीत बुमराहने यशस्वी पुनरागमन केले ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे; परंतु वर्ल्डकप संघात निवडलेल्या भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, यजुवेंद्र चहल हे चिंतेचा विषय आहेत. भुवनेश्वर डेथ ओव्हर्समध्ये प्रचंड महागडा ठरतोय, पण दुखापतीतून सावरून संघात पुनरागमन करणारा हर्षल पटेलची गोलंदाजीही आश्वासक वाटत नाही. त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता जाणवत आहे. फिरकी विभागात अक्षर पटेलने जडेजाची उणीव भासू दिलेली नाही; परंतु चहलची कामगिरी ढासळली आहे.

फलंदाजीत रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांना कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे. भारतीय फलंदाज लेगस्पीन खेळताना अडखळत असल्याचे दिसते. अ‍ॅडम झम्पा हा त्यांच्या कमजोरीचा फायदा उठवत आहे. भारतासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्दिक पंड्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दिनेश कार्तिकला यापुढेही संधी मिळू शकते.

ऑस्ट्रेलियापुढेही अनेक आव्हाने (IND vs AUS T20)

भारतासारखेच ऑस्ट्रेलियन संघही गोलंदाजीबाबत चिंताग्रस्त आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी भारतीयांना दोनशेपार धावा करून दिल्या. फलंदाजांनी त्याचा पाठलाग करून विजय मिळवून दिला; परंतु दुसर्‍या सामन्यात ते 91 धावांचा बचाव करू शकले नाहीत. पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि डॅनियल सॅम्स यांनी 11 च्या सरासरीने धावा दिल्या. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलकडूनही संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहेे.

भारत वि. ऑस्ट्रेलिया (IND vs AUS T20)

स्थळ : हैदराबाद
वेळ : संध्याकाळी 7 वाजता
प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क

Back to top button