पाक अभिनेत्रीने अमित मिश्राला ट्रोल करण्याचा प्रयत्न तिला मिळाले चोख प्रत्युत्तर | पुढारी

पाक अभिनेत्रीने अमित मिश्राला ट्रोल करण्याचा प्रयत्न तिला मिळाले चोख प्रत्युत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अमित मिश्रा अलीकडेच ट्विटरवर त्याच्या विनोदी उत्तरांमुळे इंटरनेटवर खूप प्रसिद्ध होत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी लेगस्पिनर अमित मिश्राने ट्विटरवर एक पोस्ट टाकली होती की, आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केल्यास मी संपूर्ण आठवडा अफगाण चाप खाईन. मात्र अफगाणिस्तानच्या पराभवानंतर एका पाकिस्तानी अभिनेत्रीने अमित मिश्राला त्याच्या ट्विटमुळे ट्रोल केले. यानंतर मिश्राने या अभिनेत्रीची आपल्या उत्तराने बोलतीच बंद केली आहे.

पाकिस्तानच्या विजयानंतर अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या सेहर शिनवारीने अमित मिश्राला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तिने लिहिले की, अरे बिचाऱ्या मिश्रा तूला संपूर्ण आठवडा शेणावर घालवावा लागेल. यासोबतच तिने हसणारा इमोजीही पोस्ट केला आहे.

तिच्या या ट्विटरवरील पोस्टनंतर अमित मिश्राने शिनवारीच्या ट्विटला जोरदार प्रत्युत्तर देत तिची बोलतीच बंद केली. शिनवारीच्या ट्विटला उत्तर देताना अमित मिश्रा यांने लिहिले की, “त्याचा पाकिस्तानात येण्याचा कोणताही इरादा नाही.” या  ट्विटनंतर सोशल मीडियावर अमित मिश्रा यांचे उत्तर प्रचंड व्हायरल होत असून चाहतेही त्याच्या या उत्तराने खूप आनंदी होत आहेत.

आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ फेरीत पाकिस्तानने अफगानिस्तानवर १ गडी राखून विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात अफगानिस्तानने शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. शाबाद खान, इफ्तिखार खान यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने अफगानिस्तानवर १ गडी राखून विजय मिळवला. बाबर आझम आणि फखर जमान लवकर तंबूत परतल्यानंतर काही काळ इफ्तिखार खान आणि मोहम्मद रिजवान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. शेवटच्या षटकात नसीम शाहने दोन षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानच्या या विजयाने भारतीय संघ आशिया चषक २०२२ मधून बाहेर पडला आहे. बुधवारी पाकिस्तानकडून अफगाणिस्तानचा पराभव झाल्याने टीम इंडियाचा प्रवास संपला. अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला असता तर भारताच्या आशा जिवंत राहिल्या असत्या. नसीम शाहने शेवटच्या षटकात दोन षटकार मारून पाकिस्तानला अंतिम फेरीत नेले. या सामन्याबाबत भारतातील सर्वजण अफगाणिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करत होते.

Back to top button