ENG vs SA : इंग्लंडचा तीन दिवसांत धुव्वा | पुढारी

ENG vs SA : इंग्लंडचा तीन दिवसांत धुव्वा

लंडन ; वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेने (ENG vs SA) शुक्रवारी लॉर्डस् क्रिकेट मैदानावर यजमान इंग्लंडचा 3 दिवसांत धुव्वा उडवला. आफ्रिकेने 1 डाव व 12 धावांनी पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली; शिवाय जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या उंबरठ्यावर धडक दिली आहे. आफ्रिकेच्या गुणांची टक्केवारी 75 टक्के झाली असून, दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे 70 टक्के गुण आहेत. इंग्लंड सातव्या क्रमांकावर आहे, तर भारतीय संघ 52.08 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

कागिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीने यजमानांचा पहिला डाव 165 धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात आफ्रिकेने दमदार खेळ करताना 326 धावा करून पहिल्या डावात 161 धावांची आघाडी घेतली. बेन स्टोक्स (3-71), स्टुअर्ट ब्रॉड (3-71) यांनी चांगली गोलंदाजी केली.

इंग्लंडकडून पहिल्या डावात ऑली पोपने (73) सर्वाधिक धावा केल्या. कागिसो रबाडाने 52 धावांत 5 विकेटस् घेतल्या. आफ्रिकेचे सलामीवीर डीन एल्गर (47) व सॅरेल एर्व्ही (73) यांनी दमदार सुरुवात करून दिली. मार्को येनसेनने 48 धावांची खेळी केली, तर केशव महाराजने 41 धावा केल्या. (ENG vs SA)

इंग्लंडचा दुसरा डाव 149 धावांत गडगडला. एनरिच नॉर्खिया (3-47), मार्को येनसन (2-13), कागिसो रबाडा (2-27) व केशव महाराज (2-35) यांनी उल्लेखनीय गोलंदाजी केली. आफ्रिकेने या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील एक स्थान स्वतःच्या नावावर पक्के केले आहे.

Back to top button