IND vs WI 1st ODI : ऐतिहासिक सामन्यात भारताने ६ गडी राखून केले वेस्ट इंडिजला पराभूत | पुढारी

IND vs WI 1st ODI : ऐतिहासिक सामन्यात भारताने ६ गडी राखून केले वेस्ट इंडिजला पराभूत

अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन डेस्क ः वेस्ट इंडिजवर ( IND vs WI 1st ODI ) सहा गड्यांनी मात करत भारताने एकदिवसीय मालिकेचा विजयाने प्रारंभ केला. तसेच मोठ्या दिमाखात भारताने आपल्या १००० व्या सामन्यातील विजय साजरा केला. विंडिजने दिलेल्या १७६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या २७ षटकातच पूर्ण केला. या विजयात रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत कर्णधाराची भूमिका चोखपणे पार पाडली. आपल्या नेतृत्त्वाखाली संघ आक्रमकपणे प्रतिस्पर्ध्यास चितपट करेल असा संदेश जणू त्याने आपल्या खेळीतून दिला. या सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही पातळीवर सरस कामगिरी बजावत विंडिजला सर्वपातळ्यांवर नामोहरण केले.

विंडिजच्या ( IND vs WI 1st ODI ) आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक पावित्रा घेतला. दुखापतीतून संघात परतलेल्या कर्णधार रोहित शर्माने विंडिजचा चांगलाच समाचार घेतला. त्याने विंडिजच्या सर्व गोलदाजांना फोडून काढत सर्व दिशांना फटकेबाजी केली. अकराव्या षटकात भारतीय संघाने नाबाद ७० धावा केल्या. पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवर रोहित शर्माने आपले ४४ वे अर्धशतक दिमाखात साजरे केले. त्याने ४२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी इशान किशन फक्त १५ धावांवर खेळत होता. रोहितने पुढे फटकेबाजी चालूच ठेवली. अखेर १४ षटकातील पहिल्या चेंडूवर अल्जारी जोसेफने रोहितला पायचित केले. रोहितने आपल्या आक्रमक खेळीत ५१ चेंडूत ६० धावांची खेळी केली. यात त्याने १० चौकार आणि १ षटकार ठोकला.

रोहित नंतर माजी कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. विराटने येताच क्षणी २ चौकार लगावले. विराट आता रोहित प्रमाणेच आक्रमक फटकेबाजी करणार असे वाटताना तो देखिल अल्जार जोसेफची शिकार ठरला. अवघ्या ८ धावांवर विराटला माघारी परतावे लागले. पुढे १७ व्या षटकात इशान किशन याला अकिल हुसेन याने बाद केले. इशानने २८ (३६ ) धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शिवाय त्याने रोहित सोबत ८४ धावांची भागिदारी रचली होती. या खेळीत त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचला होता. पुढील षटकात ऋषभ पंत धाव बाद झाला. त्याला अल्जारी जोसेफ याने बाद केले. पंतने ११ (९) धावांची खेळी केली. पण, पाठोपाठ विकेट पडल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. केवळ ३२ धावांत भारताने ४ फलंदाज गमावले होते आणि भारताची अवस्था ४ बाद ११६ अशी झाली होती. पण संघासाठी सूर्यकुमार यादव व दीपक हुडा धावून आले. ( IND vs WI 1st ODI )

सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा यांनी कोणतेही पडझड न होऊ देता भारताला विजयी पथावर सुखरुप पोहचवले. २८ षटकामध्ये वेस्ट इंडिजने दिलेले आव्हान भारताने लिलया पार केले. शेवटी सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा याने ६२ धावांची भागिदारी केली. सूर्यकुमार याने ३६ चेंडूत ३४ धावा तर दीपक हुडा याने ३२ चेंडूत २६ धावा करुन दोघे नाबाद राहिले. भारताच्या फलंदाजीसमोर वेस्टइंडिजची गोलंदाजी निष्प्रभ ठरली. अल्जारी जोसेफ याने २ तर अकील हुसेन याला १ बळी मिळवता आला. तसेच जोसेफ याने ऋषभ पंतला धाव बाद केले. या शिवाय विंडिजला कोणताही प्रभाव पाडता आला नाही.

तत्पुर्वी, भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजसंघास ( IND vs WI 1st ODI ) पहिल्या एकदिवसीय सामन्यात १७६ धावांत गारद होण्याची नामुष्की ओढावली. भारतीय संघाने केलेल्या भेदक गोलंदाजीवर वेस्टइंडिजचा संपूर्ण संघ ४३.५ षटकात १७६ धावांवर आटोपला. जेसन होल्डर ५७ (७१) व फॅबेन ॲलन २९ (४३) वगळता कोणालाही भारताच्या गोलंदाजीचा सामना करता आला नाही. ठराविक अंतरावर विंडिजच्या फलंदाजांनी आपल्या विकेट बहाल केल्या.

भारताकडून ( IND vs WI 1st ODI ) यजुवेंद्र चहल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या सामन्यात ४ बळी घेत कारकिर्दीत १०० बळी घेण्याचा महत्त्वपूर्ण ठप्पा त्याने पार केला. भारताच्या ऐतिहासिक १००० व्या एकदिवसीय सामन्यात त्याने ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली. चहलसह वॉशिंग्टन सुंदर यानेही ३ बळी पटकावले. तसेच प्रसिद्ध कृष्णाने २ तर मोहम्मद सिराज १ बळी घेण्यात यशस्वी ठरला. लॉर्ड ठाकूरच्या पदरी मात्र निराशा आली. त्याला एक देखिल बळी घेता आला नाही.

हा ऐतिहासिक( IND vs WI 1st ODI ) सामना जिंकण्यासाठी निर्धारित ५० षटकात १७७ धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ हे आवाहन लिलया पार करेल अशी परिस्थिती सध्या दिसत आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात येत आहे. या सामन्याच्या निमित्ताने भारत आपला १००० वा एकदिवसीय सामना खेळत आहे. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय चांगलाच लाभदायक ठरला.

हेही वाचलत का?

Back to top button