

एकदा आचार्य अत्रेंना काही संगीत प्रेमींनी लताबद्दल लिहायला सांगितलं. तेव्हा शब्दप्रभू अत्रे म्हणाले, "केवळ लोखंडाच्या निपातून उतरलेल्या शाईनं, जाड्या भरड्या कागदावर लताला अभिवादन करणं म्हणजे एखाद्या अप्सरेच्या मृदुल चरणकमलाखाली गोणपाटाच्या पायघड्या अंथरण्यासारखं आहे."
लताच्या प्रतिभेला साजेसं अभिवादन करायचं असेल तर… "पहाटकाळची कोवळी सुवर्ण किरणं दवबिंदूमध्ये भिजवून कमलतंतूच्या लेखणीनं फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाबकळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं. लताचा आवाज हा मानवीसृष्टीतला एक अद्भुत चमत्कार आहे. साक्षात विधात्यालासुद्धा असा चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही."
"श्रीकृष्णाच्या मुरलीची साद, उर्वशीच्या नूपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या वीणेचा झंकार हे तिन्ही एकवटून विधात्याने आपल्या लताचा कंठ घडवला असेल. सूर, लय, ताल, सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी जिथं एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर असं म्हणावं. कारण, संगीतातील सात सूर म्हणजे फक्त आणि फक्त आपली… ल ता मं गे श क र.