बाईपण भारी देवा : केदार शिंदेच्या चित्रपटाचा टिझर रीलीज | पुढारी

बाईपण भारी देवा : केदार शिंदेच्या चित्रपटाचा टिझर रीलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरचं काही सांगून जाणार आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर एका खास मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे. २८ एप्रिल रोजी, केदार शिंदे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ रिलीज झाला आहे. आता आगामी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’चा टिजर रिलीज झाला आहे.

यावर केदार शिंदे म्हणतात, “आपल्याकडे विविध विषयांवर सिनेमे बनवले जातात. पण बायकांच्या मनाचा किंवा भावनांचा विचार क्वचितच केला जातो. तोच विचार मी अगं बाई अरेच्चा करताना केला आणि आता बाईपण भारी देवा मध्ये यातील पुढच्या टप्प्याचा विचार केला जाईल. प्रत्येक स्त्रीला तिची कथा बघतेय किंवा ही तर मीच आहे असा फील देणारी ही फिल्म आहे. पहिल्यांदाच प्रेक्षकांना एकाच वेळी माझ्या दोन वेगवेगळया विषयावर बनलेल्या सिनेमांची अनुभूती अनुभवता येईल.”

या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब असे कलाकार असतील. ‘बाईपण भारी देवा’ ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात भेटीस येत आहे.

Back to top button