नागपूर : हिंगणा एमआयडीसी परिसरातील इंक कंपनीला भीषण आग | पुढारी

नागपूर : हिंगणा एमआयडीसी परिसरातील इंक कंपनीला भीषण आग

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसी परिसरातीलवर्षा प्रिंटिंग इंक या शाई तयार करणाऱ्या कारखान्याला गुरूवारी (दि.२३) सकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कार्यालय, कारखान्याची इमारत, मशिनरी, आतमध्ये ठेवलेला कच्चा माल जळून खाक झाला. सुमारे पाच तासाच्या परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत लाखोंचे नुकसान झाले.

दशरथ नथ्थुलाल पाटील यांच्या मालकीच्या प्लॉटमध्ये वर्षा प्रिंटिंग इंक हा प्रिंटिंग शाई तयार करण्याचा कारखाना आहे. . मागील ४६ वर्षांपासून हा कारखाना सुरू आहे. रात्रपाळीत कारखाना बंद असतो. आज सकाळी सुरक्षा रक्षकाला आग लागल्याचे दिसताच त्याने मालकासह अग्निशमन दलाला याची माहिती दिली. सुरवातीला एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, शाई तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन (थिनर) हे ज्वलनशील असल्याने शाई भरून तयार असलेल्या काही ड्रममध्ये स्फोट होत होते. बाजूला असलेल्या डिंगडोह गावातून सुद्धा आगीचे आणि धुराचे लोळ दिसत होते. त्यामुळे सुरवातीला ही आग विझविण्यासाठी थोडा त्रास झाला. त्यानंतर वाडी, वानाडोंगरी,नागपूर, मिहान भागातून सुद्धा अग्निशमन दलाच्या ७-८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर पाच तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान या कारखान्यात असलेला कच्चा आणि पक्का माल, सर्व मशिनरी, कार्यालय व कंपनीच्या आतमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असू शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button