वराला लग्नमंडपात चोप; वधुचे चुंबन घेणे पडले महागात | पुढारी

वराला लग्नमंडपात चोप; वधुचे चुंबन घेणे पडले महागात

पुढारी ऑनलाईन डेस्क : विवाह सोहळा वधू आणि वर तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी एक उत्सव असतो. बदलत्या काळानुसार लग्नसोहळ्यांमध्ये नवनवीन ट्रेंड पाहायला मिळतात. पण अशाच एका ट्रेंडचे अनुकरण करणे वराला चांगले महागात पडल्याचे समोर आले. उत्तर प्रदेशातील हापूर शहरात एका वराने चक्क लग्नमंडपातच आपल्या वधूचे सर्वांसमोर चुंबन घेतले. या प्रकारामुळे वधूकडच्या मंडळींना राग अनावर झाला. ज्यातून त्यांनी आपल्या होणा-या जावयाची धुलाई केली.

दरम्यान, आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून वराकडचे लोक आक्रमक झाले. त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण वधूकडील जमावाने त्यांना लाठ्या-काठ्यांनी ठोकून काढले. या मारहाणीत वराकडचे सहा लोक जखमी झाले. त्यात वधूच्या वडिलांचाही समावेश आहे. जखमींना खासगी रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी शांतता भंग केल्यामुळे दोन्ही कुटुंबियातील एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वधूच्या वडिलांनी आपल्या दोन्ही मुलींचे एकाच मांडवात लग्न लावले. पहिला विवाह कोणत्याही त्रासाशिवाय पार पडला. मात्र दुसऱ्या लग्न सोहळ्याला गालबोट लागले. वधूच्या कुटुंबीयांनी आरोप केला की वराने मंचावर वधूचे बळजबरीने चुंबन घेतले. तर वराने सांगितले की वधूने वरमाला समारंभानंतर चुंबन घेण्याचा आग्रह केला होता.

हापूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, या प्रकरणी अद्याप कोणत्याही कुटुंबाकडून कसलीही लेखी तक्रार आलेली नाही. त्यामुळे तक्रार आल्यावर कारवाई केली जाईल. यामधील सहा जणांवर सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button