म्युझिकल ‘सर्जा’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच | पुढारी

म्युझिकल 'सर्जा' चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच

पुढारी ऑनलाईन : प्रत्येक लव्हस्टोरीत काही ना काही वेगळेपण असल्यामुळे अनेक लेखक-दिग्दर्शकांना सिल्व्हर स्क्रिनवर प्रेमकथा सादर करण्याचा मोह धरतात. ‘सर्जा’ या आगामी मराठी चित्रपटातही चाहत्यांना म्युझिकल लव्हस्टोरी पहायला मिळणार आहे. ग्रामीण बाजाच्या या चित्रपटात चाहत्यांना प्रेमातील आजवर कधीही लाईमलाईटमध्ये न पाहिलेलं पैलू पहायला मिळणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. कोणताही ओळखीचा चेहरा नसूनही रिलीज करण्यात आलेलं ‘सर्जा’ चं पोस्टर चाहत्यांची वाहवा मिळवत आहे.

राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या ‘सर्जा’ ची निर्मिती अमित जयपाल पाटील यांनी तर रमेश रंगराव लाड हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘सर्जा’ या म्युझिकल लव्हस्टोरीचं दिग्दर्शन धनंजय मनोहर खंडागळे यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लेखनही खंडागळे यांनीच केलं आहे. पूर्णपणे ग्रामीण पार्श्वभूमी असलेली ही कथा खेडेगावातील आहे. ‘सर्जा’ मध्ये मुख्य भूमिकेत मराठीतील कोणताही मोठा स्टार नसूनही रसिकांच्या मनात कुतूहल निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे. सोशल मीडियावर या पोस्टरचं प्रचंड कौतुक होत असल्याने, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘रौंदळ’ चित्रपटामुळे लाइमलाईटमध्ये असलेल्या संगीतकार हर्षित-अभिराज यांनी ‘सर्जा’ साठी सुमधूर संगीत दिलं आहे. हर्षित-अभिराज यांनीच पार्श्वसंगीतही दिलं आहे. या चित्रपटात अनिल नगरकर, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, ऐश्वर्या भालेराव, आकाश पेटकर, ज्योती शेतसंधी, जगन्नाथ घाडगे, विष्णू केदार, प्रशांत पिसे, बालकलाकार गौरी खंडाळे, कुणाल गायकवाड आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. प्रशांत प्रल्हाद शिंदे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून राहुल मोतलिंग यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. सुबोध नारकर यांनी संकलन केलं असून कला दिग्दर्शन सुनील लोंढे यांचे आहे. १४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button