Jadeja vs Smith : स्मिथ करत राहिला अश्विनची तयारी, पण जडेजाला विसरला!(Video) | पुढारी

Jadeja vs Smith : स्मिथ करत राहिला अश्विनची तयारी, पण जडेजाला विसरला!(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jadeja vs Smith : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी नागपुरात सुरू झाली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस गमावला असला, तरी टीम इंडियाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. विशेषत: प्रत्येकजण टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजाची वाट पाहत होता, ज्याने तब्बल पाच महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे.

जडेजाने भलेही दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन केले असले, तरी त्याची गोलंदाजी पाहून तो क्रिकेटपासून दूर होता असे अजिबात जाणवले नाही. टीम इंडियाने संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला 177 धावांत गुंडाळले. यात मोठा वाटा उचलला तो रवींद्र जडेजाने. त्याने दहापैकी पाच विकेट्स पटकावल्या.

दरम्यान, पाच विकेट्सची बाब ठीक असली तरी आणखी एक नवा विक्रम रचण्याचे काम जडेजाने केले आहे. आता तो स्मिथला सर्वाधिक वेळा क्लिन बोल्ड करणारा जगातील गोलंदाज बनला आहे.

संबंधित बातम्या

स्मिथला करावा लागला संघर्ष

जडेजा आणि स्मिथ हे आतापर्यंत 13 डावांमध्ये आमनेसामने आले आहेत. यात डावखुरा फिरकीपटू जड्डूने स्मिथची तीन वेळा शिकार केली आहे. स्मिथला दोनदा बाद करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताच्या भुवनेश्वर कुमारचा समावेश आहे. ज्याने त्याला सहा डावात दोनदा बाद केले आहे. श्रीलंकेच्या रंगना हेरातनेही त्याला सहा डावांत दोनदा बाद केले. त्याचवेळी जेम्स अँडरसन (36 डाव) आणि इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड (40 डाव) यांना स्मिथला दोन-दोनवेळ बाद करण्यात यश आले आहे. मात्र आता रवींद्र जडेजा या बाबतीत नंबर वन बनला आहे.

विशेष बाब म्हणजे भारतात आल्यानंतर स्मिथने रविचंद्रन अश्विनच्या चेंडूंचा सामना करण्याची तयारी ठेवली. त्यासाठी त्याने भारतीय गोलंदाजांचा आधार घेतला, पण बहुधा रवींद्र जडेजाची तयारी विसरला आणि आता त्याचा बळी ठरला. या सामन्यात स्मिथला 107 चेंडूत केवळ 37 धावा करता आल्या. यादरम्यान त्याने सात चौकार मारले.

स्मिथ अश्विनची तयारी करत राहिला, पण जडेजाला विसरला

जडेजा आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियासोबत होता, पण टूर्नामेंटच्या मध्यभागी तो जखमी झाला आणि त्यानंतर त्याला भारतात परत यावे लागले. ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी टीम इंडियाची घोषणा केली तेव्हा रवींद्र जडेजाचाही समावेश होता, मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल तरच खेळेल, अन्यथा तो बाहेर बसेल, अशी अट घालण्यात आली होती.

यानंतर जडेजा सौराष्ट्रकडून रणजीमध्ये खेळला आणि चांगली कामगिरी केली. त्यानंतरच तो भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करू शकला. आजच्या सामन्यात जडेजाने मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रॅनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब आणि टॉड मर्फी यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याची दुस-या डावातही तो चमत्कार करेल अशी अपेक्षा आहे.

जड्डूचा पंच, कांगारूंविरुद्ध 50 बळींचा टप्पा पार

रविंद्र जडेजाने पहिल्या डावात अनेक विक्रम केले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 50 कसोटी बळींचा टप्पा पार केला. भारतीय गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे. अष्टपैलू जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळताना तीन वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्यात यश मिळाले आहे. हरभजन सिंग (86)ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय भूमीवर सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने केली आपल्याच विक्रमाची बरोबरी

भारतातील कसोटी सामन्यातील कांगारू संघासाठी पहिल्या डावातील ही संयुक्त दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. नोव्हेंबर 1956 मध्ये कांगारू संघ ईडन गार्डन्सवर 177 धावांवर ऑलआऊट झाला होता.

भारतातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी धावसंख्या 174 आहे जी त्यांनी 1964 मध्ये केली होती. भारतातील ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 31 पैकी केवळ चार वेळा 200 पेक्षा कमी धावसंख्येवर गडगडला आहे.

1996 नंतर पहिलीच वेळ आहे जेव्हा कांगारू संघ भारताविरुद्ध पहिल्या डावात 200 पेक्षा कमी धावसंख्येत गारद झाला. 1996 मध्ये दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 182 मध्ये ऑलआऊट झाला होता.

Back to top button