तडका : प्रॉमिस डे | पुढारी

तडका : प्रॉमिस डे

सध्या व्हॅलेंटाईन आठवड्याची लगबग तरुणाईमध्ये जोमात सुरू आहे. रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे यानंतर येऊन गेला तो कालचा प्रॉमिस डे. प्रॉमिस डे म्हणजे दिलेले वचन निभावण्याचा दिवस. हा प्रॉमिस डे म्हणजे आपल्या जोडीदाराला आपण जे काही वचन दिले आहे, त्याला आपण बांधील राहू, असे मान्य करून साजरा केला गेला. प्रभू श्रीरामचंद्रांचे पुरातन असे वचन या निमित्ताने आठवले आणि ते म्हणजे ‘प्राण जाये पर वचन न जाये.’ याचा अर्थ प्राण गेला तरी बेहत्तर, पण दिलेल्या वचनाला जागणार म्हणजे जागणारच. प्रेमीजनांमध्ये साध्या भाषेत बोलायचे तर प्रेम केले असेल तर ते निभावणार आणि ते लग्नामध्ये रूपांतरित करून या जन्मी संसार करणार, अशी भावना असावी.

व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्याच्या निमित्ताने आलेला प्रॉमिस डे खरे तर राजकारणी लोकांनी साजरा केला तर फार चांगले होईल. पहिले म्हणजे निवडणूक लढवताना जी वचने आपण मतदारांना देतो, ती निवडून आल्यानंतर पूर्ण करणे एवढे केले तरी पुरेसे झाले. आश्वासनाला काही अर्थ न उरल्यामुळे आता राजकीय लोक वचने देत आहेत. म्हणजे नगरपरिषदेची किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल तर इच्छुक उमेदवार गुळगुळीत रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छता, रस्त्यावरचे दिवे आणि एकंदरीतच आपला वॉर्ड सिंगापूरच्या वॉर्डइतका स्वच्छ ठेवण्याचे वचन देतात. आमदारकीची निवडणूक असेल तर मतदारसंघात विकास प्रकल्प आणणे, रस्ते मजबूत करणे आणि एकंदरीतच मतदारांचा विकास करून त्यांची प्रगती साधून देणे, अशा प्रकारची वचने दिली जातात. खासदारकीची निवडणूक असेल तर देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा, परराष्ट्र धोरण, देशाचा विकास असे मोठे विषय असतात.

प्रॉमिस डे राजकारणी लोकांनी साजरा करण्याचा आग्रह करण्याचे कारण म्हणजे त्यांनी दिलेली वचने पाळली पाहिजेत, तरच मतदारांचा त्यांच्यावर विश्वास बसू शकेल. प्रत्यक्षात परिस्थिती अशी असते की, एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा म्हणून आपल्या वॉर्डकडे, गावाकडे, तालुक्याकडे आणि जिल्ह्याकडे पाहतसुद्धा नाही. ‘पब्लिक मेमरी इज शॉर्ट’ म्हणजे अर्थातच लोकांची स्मृती अल्पकालीन असते, अशा प्रकारची राजकारणामध्ये लोकप्रिय असलेली एक म्हण आहे. उमेदवाराने दिलेली वचने पूर्ण केली नाहीत तर कालांतराने त्याने काय वचने दिली आहेत, हे केवळ उमेदवारच नाही, तर मतदारसुद्धा विसरून गेले असतात. अशीच पाच वर्षे जातात आणि या वेळेला प्रचार करताना मागचे मुद्दे विसरून नव्याने नवे मुद्दे आणले जातात. लोकही याला भुलून पुन्हा नव्या उत्साहाने मतदान करतात आणि उमेदवार मंडळी निवडून आली की, पुन्हा ये रे माझ्या मागल्या ही परंपरा पुढे सुरू राहते.

संबंधित बातम्या

आज गरज असेल तर निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराने प्रॉमिस डे साजरा करण्याची. किमान या प्रॉमिस डेला आपण काय वचने दिली होती, याची आठवण जरी केली तरी पुष्कळ झाले, असे म्हणता येईल. वचन द्यायचे आणि साफ विसरून जायचे ही केवळ प्रेमामधीलच नव्हे, तर राजकारणामध्येही मान्यताप्राप्त संकल्पना आहे. जोपर्यंत ही संकल्पना बदलली जात नाही, तोपर्यंत प्रॉमिस डे म्हणजे वचन साजरा करण्याचा दिवस खर्‍या अर्थाने सफल होत नाही.

Back to top button