गोष्ट हिमालयाएवढी! | पुढारी

गोष्ट हिमालयाएवढी!

उत्तराखंडच्या उत्तर काशीमधील सियालक्यारा बोगद्यात तब्बल चारशे तास जीवन-मृत्यूचा जो संघर्ष सुरू होता, तो कुठल्याही चित्रपटाहून अधिक चित्तथरारक. प्रत्यक्ष घटना चित्रपटाहून अधिक खिळवून ठेवणारी. तब्बल चारशे तासांचा खेळ चालला. देशभरातील एकशे तीस कोटी लोकांचे लक्ष या घटनेने वेधून घेतले. दिवाळीच्या पहाटेच्या घटनेनंतर अनेकांना दिवाळी गोड लागली नाही. दोन-पाच दिवसांत मोहीम फत्ते होईल, असे सुरुवातीचे चित्र होते; परंतु दिवसेंदिवस त्यातील जटिलता समोर येऊ लागली आणि चिंताही वाढू लागली. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, घटना घडल्यानंतर तातडीने अडकलेल्या मजुरांसाठी खाण्या-पिण्याच्या बाबी आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. नंतरच्या काळात बीएसएनएलने आत दूरध्वनीची सुविधा निर्माण केली, जेणेकरून मजुरांना आपल्या कुटुंबांशी संवाद साधता यावा. या गोष्टी केवळ सुविधेपुरत्या मर्यादित नव्हत्या, तर मृत्यूशी झुंज देणार्‍या मजुरांची आणि हवालदिल झालेल्या त्यांच्या कुटुंबीयांची हिंमत वाढवणार्‍या होत्या.

अडकलेल्या मजुरांचे कुटुंबीय, नातेवाईक अधूनमधून दूरचित्रवाणीच्या पडद्यावर येऊन आपल्या भावना व्यक्त करीत, तेव्हा काळजाला चरे पडल्यावाचून राहत नव्हते. आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणार्‍या या खेळाची सांगता मंगळवारी सायंकाळी झाली, तेव्हा देशवासीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाकी कुणासाठी असेल-नसेल; परंतु 41 मजुरांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हुकलेल्या दिवाळीचे लक्षदीप सतरा दिवसांनी पुन्हा उजळले. या श्रमिकांसाठी या दिवाळीची लज्जत काही औरच ठरली. तब्बल चारशे तास म्हणजे सतरा दिवस बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांची सुखरूप सुटका करणे, ही सोपी गोष्ट नव्हतीच. सुटकेसाठी प्रयत्न करणार्‍या यंत्रणांच्या आणि त्यात सहभागी कामगारांपासून अधिकार्‍यांच्या आणि बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या द़ृष्टीनेसुद्धा ही अभूतपूर्व घटना म्हणावी लागेल.

परंतु, दोन्ही बाजूंनी घडवलेले विजिगीषू वृत्तीचे दर्शन संपूर्ण जगाला विस्मयचकित करणारे होते. श्रद्धा आणि सबुरी हा धार्मिक क्षेत्रातला मंत्र असला, तरी त्या वर्णनासाठी ही घटना चपखल ठरते. त्याला चिकाटी आणि जिद्दीची जोड मिळाली तर काय होऊ शकते, याचे दर्शन सियालक्यारामध्ये घडले. मजुरांची सुखरूप सुटका झाल्यानंतर संपूर्ण देशाने सुटकेचा निःश्वास टाकला. सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर अशक्य ते शक्य करता येते, हे या घटनेने दाखवून दिले. जिद्दीपुढे काळे कातळही कसे वितळतात, हे या असाध्य कार्याने दाखवून दिले. राखेतून भरारी घेणार्‍या फिनिक्स पक्ष्याची गोष्ट नेहमी सांगितली जाते, त्याऐवजी भविष्यकाळात बोगद्यातून बाहेर आलेल्या मजुरांच्या या अचाट जिद्दीची गोष्ट सांगितली जाईल.

संबंधित बातम्या

कष्टकरी समाज शारीरिकद़ृष्ट्याच नव्हे, तर मानसिकद़ृष्ट्याही खंबीर असतो, हे या घटनेने दाखवून दिले. नाहीतर दरड कोसळलेल्या बोगद्यात तब्बल सतरा दिवस अडकून पडणे आणि त्यातून सुखरूपपणे बाहेर पडणे, ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हतीच. जीवन-मरणाच्या सीमेवर असताना, जीव मुठीत घेऊन येणारा क्षण पुढे ढकलताना, जगण्यावरची श्रद्धा थोडीही ढळू न देता हिमतीने आणि धैर्याने प्रसंगाला सामोरे जाण्याचे हे धाडस व्यवस्थापनाच्या कोणत्याही धड्यात शिकायला मिळणार नाही. आपत्ती निवारणाच्या इतिहासातही असे प्रसंग अपवादानेच. त्यातही प्राण वाचवण्यात मिळालेले यश तसे दुर्मीळच. देशातील प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आणि तो वाचवण्यासाठी सरकार आपल्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध असते, हे या घटनेने दाखवून दिले. यंत्राची ताकद कमी पडते, तिथे शेवटी मानवी ताकदच कामी येत असते, हेही दिसून आले.

कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी ऑगर मशीनच्या माध्यमातून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना मशीनमध्ये बिघाड झाला, तेव्हा चिंतेत भर पडली; परंतु यंत्र थांबले म्हणून मानवी प्रयत्न थांबले नाहीत. जिथे मजूर अडकले होते, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अन्य तीन पर्यायांची चाचपणी सुरू झाली होती. त्यातही पुन्हा लवकरात लवकर पोहोचण्याचा मार्ग कोणता, याचा खल तज्ज्ञांमध्ये सुरू झाला. मशीन बंद पडली तिथून पुढे मानवी पद्धतीने खोदकाम करण्याचा पर्याय सर्वाधिक भरवशाचा होता. ‘उंदीर खुदाई’ (रॅट मायनिंग) असे त्याला संबोधले जाते. उंदीर ज्याप्रमाणे एखादी जागा टोकरत पुढे जातो, त्याचप्रमाणे संबंधित निष्णात माणसांकडून पुढे खोदत जाण्याचा हा पर्याय होता. तो कठीण आणि आव्हानात्मक होता. ते आव्हान पुन्हा मजुरांनी स्वीकारले.

ऑगर मशीन बंद पडल्यानंतर मोहीम पूर्ण होण्यासाठी आठवडाभराहून अधिक काळ लागेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात दुसर्‍याच दिवशी मोहीम फत्ते झाली. बोगद्याचे हे काम एका खासगी कंपनीमार्फत सुरू असले, तरी दुर्घटनेनंतरचे बचावकार्य मात्र सरकारी यंत्रणा करीत होत्या. ही घटना कशी घडली आणि तिचे गांभीर्य वाढण्याचे कारण काय, या बाबींची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही बोगद्यामध्ये दुर्घटनाप्रसंगी बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याचे बंधन असते; परंतु इथे हा नियम डावलल्याचे आढळून आले. नियमांचे पालन न करणार्‍या संबंधित कंपनीच्या हलगर्जीची शिक्षा कंपनीला मिळायला हवी आणि मोहिमेसाठीचा खर्च त्या कंपनीकडून वसूल करावयास हवा.

निसर्ग विरुद्ध माणूस असा संघर्ष अलीकडच्या काळात तीव्र बनत चालला आहे, त्याचाच हा एक भाग. हिमालय पोखरून बोगदे काढले जात असतील, तर हिमालय ते कधीपर्यंत सहन करणार? हा प्रश्न आहेच. अजस्त्र यंत्रांच्या बळावर माणूस स्वत:ला शक्तिमान समजत असला, तरी अशा दुर्घटनांच्या प्रसंगी त्याचे क्षुद्रत्व समोर येते. 41 मजुरांचे प्राण वाचवण्यात यश आले असले, तरी ही दुर्मिळातील दुर्मीळ घटना आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. असे प्रकल्प हाती घेताना सुरक्षाविषयक आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन झालेच पाहिजे, मानवी जीवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले गेले पाहिजे, हा या दुर्घटनेचा धडा.

Back to top button