‘समृद्धी’चे बळी ! | पुढारी

‘समृद्धी’चे बळी !

समृद्धी महामार्गावर बुलडाण्याजवळ झालेल्या प्रवासी बसच्या भीषण अपघाताने महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला हादरवून टाकले. अपघातातील मृतांच्या काळीज पिळवटून टाकणार्‍या घटना समोर आल्या आणि त्यातून एकेका सामान्य माणसाच्या आयुष्याची गाथा उलगडली गेली. आभाळ फाटल्यावर किंवा धरणीकंप झाल्यावर काय करायचे, हे सुचत नाही, तशीच या अपघाताने अनेकांची अवस्था झाली. वाहनांच्या वेगापासून समृद्धी महामार्गातील त्रुटींपर्यंत अनेक बाबींची चर्चा सुरू झाली आहे. खरे तर ती आधीपासूनच झाली होती. त्या चर्चेनंतर काही किरकोळ उपाययोजनांचा अपवाद सोडता पुढे काहीच झाले नाही, हेही वास्तव आहे. अशी मोठी दुर्घटना घडल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून संवेदनशीलतेने व्यवहार व्हायला पाहिजे. परंतु, अशा दुःखद प्रसंगातही नेत्यांना राजकारण बाजूला ठेवता आलेले नाही. अपघाताएवढीच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबद्दल काळजी वाटायला लावणारी ही बाब म्हणावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले-शाहू-आंबेडकरांसह समाजसुधारकांचा महाराष्ट्र देशातील अन्य राज्यांपेक्षा वेगळा होता. त्याचे सुसंस्कृत वेगळेपण उठून दिसणारे होते. परंतु, दुर्दैवाने त्याची ही वेगळी ओळख पुसत चालली आहे. अपघाताच्या दुसर्‍याच दिवशी राज्यातील राजकारणाने ते दाखवून दिले. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुंटा गावाजवळ झालेला हा अपघात भीषण होता. नागपूरहून पुण्याच्या दिशेने चाललेल्या प्रवासी बसला मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. बसमध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळचे प्रवासी होती. वेगमर्यादा ओलांडल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस आधी लोखंडी पोलला धडकून नंतर रस्ता दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. बस उलटून बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कुणालाही बाहेर पडता आले नाही. जे मोजके प्रवासी वाचले, ते काचा फोडून बाहेर आले. एकूणच अंगावर शहारा आणणारा आणि धडकी भरवणारा हा अपघात. माणसांचे जगणे एवढे गतिमान बनले आहे की, अपघात होताहेत म्हणून कुणी प्रवास टाळणार नाहीत. समृद्धी महामार्गावर अपघात झाला म्हणून समृद्धी महामार्गावरील प्रवासही कुणी टाळणार नाही. कारण सगळ्यांनाच एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणाकडे लवकरात लवकर पोहोचायचे आहे. हा प्रवास जगण्यासाठीचा आहे. माणसाच्या धावण्याच्या या अगतिकतेमुळेच लांबच लांब सुसाट वेगाने धावणार्‍या रस्त्यांची स्वप्ने दाखवली जातात. त्या रस्त्यांवर वाहन चालवण्यासाठीच्या आवश्यक प्रशिक्षणाची सोय कुठेच नसते. समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचे अनेकदा स्पष्ट होऊनही सरकारी यंत्रणा निद्रिस्त असते. अपघात रोखण्याच्या आव्हानाला कोणीच सामोरे जात नाही. समृद्धीच नव्हे तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सह राज्यातील प्रमुख महामार्गांची अवस्था याहून वेगळी नाही. अशा भीषण अपघातांच्या घटना वाढतच आहेत. त्याबद्दलची संवेदनशीलताही हळूहळू संपत चालली आहे. ज्याचा जीव जातो, त्यालाच त्या वेदना कळतात!

सध्याची व्यवस्था बाजारकेंद्री असून बाजारात मोटारींची रोज नवी आणि महागडी मॉडेल्स येत आहेत. समाजातील विषमतेची चर्चा नेहमी केली जाते. साध्या बसचे तिकीट परवडत नाही, असा मोठा वर्ग असतानाच अनेक मोटार गाड्या पदरी बाळगणारा आणि नवे महागडे मॉडेल बाजारात आल्यानंतर ते आपल्या ताफ्यात घेणारा वर्गही आहे. कनिष्ठ मध्यमवर्गही मध्यमवर्गातून उच्च मध्यम वर्गात प्रवेश करण्यासाठी कर्ज काढून अशा महागड्या गाड्यांच्या मोहात पडताना दिसतो. अशा गाड्यांसाठी तसे रस्तेही असावेत म्हणून मग समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प करावे लागतात. कुणी कितीही काही म्हणत असले तरी विकासाच्या प्रक्रियेत असे महामार्ग टाळता येण्यासारखे नाहीत. ती काळाची गरज आहे. परंतु ते करताना काही बाबींची काळजी आवर्जून घ्यावयास हवी. विकास प्रकल्पांचा मानवी चेहरा हवा. तो हरवला की काय होते, याचे उदाहरण म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहता येईल. समृद्धी महामार्गावरील थांब्यांसंदर्भात अनेक तज्ज्ञांनी वारंवार सांगूनसुद्धा अद्याप त्यासंदर्भातील कार्यवाही झालेली नाही. खरे तर महामार्गाचे उर्वरित काम पूर्ण करण्याइतकेच प्राधान्य सध्याच्या महामार्गावर सोयी-सुविधा निर्माण करण्याकडे द्यावयास हवे आणि या सुविधा म्हणजे फक्त अपघात झाल्यावर तातडीने येणारी यंत्रणा नव्हे, तर जागोजागी थांबे, विश्रांतीस्थळे, स्वच्छतागृहे वगैरे. ही जबाबदारी केवळ सरकारचीच नाही, तर सर्वच राजकीय पक्षांनी डोळ्यात तेल घालून त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होते. श्रेयवाद आणि नामकरणासाठी आटापिटा करण्यापलीकडे फारसा कुणाला रस नसल्यामुळे महामार्ग तयार झाला आणि त्यावरून वाहने सुसाट धावू लागली. अतिघाई संकटात नेई, हा जो महामार्गावर सूचना फलक असतो तो इथे खर्‍या अर्थाने लागू होतो. समृद्धी महामार्गावरील सुविधा आणि सुरक्षितता हा मुद्दा आहेच; परंतु त्याचबरोबर खासगी प्रवासी बसेसच्या असुरक्षिततेचाही मुद्दा विचारात घेण्याची आवश्यकता आहे. परिवहन विभागाच्या निष्काळजीपणामुळे राज्यात सगळीकडेच धोकादायक बसेस धावताहेत. या बसेसच्या सुरक्षिततेची तपासणी होत नाहीच; परंतु त्यांच्या अंतर्गत रचनेतील धोकादायक बाबींकडेही कुणी लक्ष देत नाही. स्लीपर सुविधा असलेल्या बसेसच्या दोन्हीकडील आसनांच्या मध्ये एवढी चिंचोळी जागा असते की, एकावेळी एका माणसालाही नीट चालता येत नाही. अशा परिस्थितीत बसमध्ये गोंधळ झाल्यास अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. मुंबईतून सुटणार्‍या अनेक मार्गांवरील स्लीपर बसेसमधील क्षमतेपेक्षा अधिक जागा, सुरक्षा व्यवस्थेचा अभाव हे प्रकार नवे नाहीत. अपघातप्रसंगी हे किती धोकादायक बनू शकते, याच्या कल्पनेनेही अंगावर काटा येऊ शकतो. एखादा मोठा अपघात झाल्यावरच संबंधित यंत्रणेला जाग येईल. खरे तर सरकारने प्रवासाच्या नीट सुविधा उपलब्ध करावयास हव्यात. खासगीकरणाचे धोरण असले तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावयास हवे. दुर्दैवाने भ्रष्ट कारभारामुळे प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर असल्यासारखे चित्र आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातापासून तरी सरकार आणि संबंधित यंत्रणा धडा घेईल, ही अपेक्षा!

संबंधित बातम्या
Back to top button