..तर तुम्हाला एवढ्या मिरच्या का झोंबल्या? अजित पवारांचा कुटुंबीयांना सवाल | पुढारी

..तर तुम्हाला एवढ्या मिरच्या का झोंबल्या? अजित पवारांचा कुटुंबीयांना सवाल

बारामती : पुढारी वृत्तसेवा : मी मतदानाला आईला हाताला धरून नेले. ती कालही माझ्याबरोबर होती, आजही आहे आणि उद्याही राहील. ती माझ्यासोबत आहे की नाही हे सांगत धाकट्या भावाने नाक खुपसण्याची गरज नाही. मला उगाच फॅमिलीचा पंचनामा करायचा नाही. आता समोरचेही शरद पवार यांना हाताला धरून नेतात ना. मी घेऊन गेलो तर त्यांना इतके का झोंबले, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

मंगळवारी ते काटेवाडीतील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी कुटुंबीयातील अन्य सदस्यांवर विशेषतः रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, माझ्या आईने पहिल्यांदा मला जन्म दिला आहे. ती माझ्यासोबत आहे का हे माझ्या धाकट्या भावाने सांगण्याची गरज नाही. त्यात त्याने नाक खुपसू नये.

वडील वारल्यानंतर मी आईला कसा आधार दिला, ते तुम्ही जनतेला विचारू शकता. शरद पवार यांनाही हाताला धरून आधार दिला जातो ना? आता मी विरोधकांच्या तीन-चार सभांमधील व्यवस्था बघितली. आमचे अख्खे खानदान तिथे बसले होते. त्यातील एकाने तर शरद पवार यांचा फोटो मांडीवर ठेवला होता. आता ते समोर असताना मांडीवर फोटो घेऊन बसण्याचे कारण काय, असा सवाल करून अजित पवार म्हणाले, ज्याने तो फोटो मांडीवर ठेवला हे त्याचे काम नाही. मी आमच्या कुटुंबाला व्यवस्थित ओळखतो. त्यांना हे कोणी तरी सांगितले असावे. मी ज्या घरात जन्माला आलो तिथले लोक कुठे आणि काय पातळीवर चालली आहेत हे यातून दिसून येते. शरद पवार यांच्या पायापाशी काय बसतात, डावीकडे-उजवीकडे काय बसतात, मागे काय उभे राहता, हा सगळा दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मी फक्त आईला हाताला धरून मतदानाला नेले, तर त्यांना मिरच्या झोंबण्याचे काही कारण नाही.

त्यांच्याजवळचे सगळे पोहोचलेले

शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल अजित पवार म्हणाले, 2004 मध्ये असाच प्रसंग उद्भवला होता. तेव्हा माझ्यासह राष्ट्रवादीतील फळीने सेनापतींना विश्रांती घ्यायला सांगत लढाई हाती घेतली होती. वास्तविक आता त्यांच्या डाव्या, उजव्या पायांजवळ चिकटून बसणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे होते. सध्या प्रचंड उष्णता आहे. त्यांना तब्येतीची काळजी घ्या, आम्ही निवडणूक यंत्रणा राबवतो, हे सांगायला पाहिजे होते. पण, ही मंडळी फार पोहोचलेली आहेत. प्रत्येकाला स्वार्थ असतो, असे अजित पवार म्हणाले.

देशाची निवडणूक समजून लोकांकडून मतदान

ही निवडणूक गावकी, भावकीची नाही, देशाची आहे. भविष्याची आहे, हे ओळखूनच मतदान होताना मला दिसते आहे. रोहित पवार व अन्य मंडळींनी ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न केला, परंतु मी सुरुवातीपासूनच विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. बूथ कार्यकर्ता मेळाव्यात मी उपस्थितांना ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगून ती भावनिकतेकडे नेली जाईल, असे सांगितले होते. मी कसे काम करतो, इतर कसे करतात हे जनतेला माहीत आहे, असे अजित पवार म्हणाले.

सुप्रिया सुळेंच्या भेटीने मतदानावर फरक नाही

सुप्रिया सुळे घरी येऊन आईला भेटून गेल्या ते मला माहीत नाही. मी बाहेर होतो. त्या भेटल्या तरी त्याचा मतदानावर काही परिणाम होणार नाही. बारामतीकर सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करतात, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

हे सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारे

राज्यात मतदानादरम्यान झालेल्या घटना चिंताजनक आहेत. धाराशिवमध्ये चाकूने भोसकण्यात आले,
अशा बातम्या आल्या. सर्वच राजकीय पक्षांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. मी गेली 35 वर्षे निवडणुका लढवतोय, असे कधी घडले नव्हते. सुसंस्कृत महाराष्ट्राला हे न शोभणारे आहे, असे
अजित पवार म्हणाले.

रोहित पवार यांची नौटंकी

आमदार रोहित पवार यांनी सोमवारपासून समोर आणलेले व्हिडीओज व केलेले ट्विट यावरून अजित पवार यांनी जोरदार निशाणा साधला. रोहित पवार हे सोशल मीडिया हाताळण्यात अत्यंत हुशार आहेत. वेल्हे तालुक्यात जिल्हा बँक शाखा रात्री सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तुम्ही तेथे जाऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासावेत. त्यातून खरे काय ते समोर येईल. भोरमध्ये एका मोटारीतून पैसे वाटल्याचा त्यांचा दुसरा व्हिडीओ आहे.

वास्तविक रोहित पवार हे सोशल मीडिया हाताळण्यात इतके पोहोचलेले आहेत की जुने व्हिडीओ दाखवून ते कालचेच आहेत, हे ते भासवू शकतील. माझ्याबद्दल वेडेवाकडे बोलणे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, हे त्यांचे काम चालूच असते. परवा सांगता सभेतही त्यांनी केलेली नौटंकी सगळ्यांनी बघितली. निवडणूक आयोग आहे, त्यांनी या प्रकरणांची चौकशी करावी. तो जे दाखवतोय त्यातील माणसांना विचारून तुम्हीच ’दूध का दूध पाणी का पाणी’ करून घ्या, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा

Back to top button