खरिपाचे नियोजन हितावह | पुढारी

खरिपाचे नियोजन हितावह

र्नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करत शेतकरी खरिपाच्या नियोजनात गुंतले आहेत. पूर्वीप्रमाणे पावसाचे आगमन आणि प्रमाण सध्या पाहायला मिळत नाही. हवामान बदल आणि अन्य कारणांमुळे पावसाचे आगमन लांबणे, मध्येच ओढ देणे किंवा अतिवृष्टी, अवर्षण असे प्रकार वारंवार उद्भवतात. त्यामुळे हवामानावर आधारित नियोजन हाच एकमेव पर्याय उरतो. कृषी अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या मार्गदर्शनानुसार खरिपाचे नियोजन करणे शेतकर्‍यांसाठी हितावह ठरेल.

देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. जून महिन्यात कमी-अधिक फरकाने मान्सूनचे आगमन होत असते. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत गुंतले आहेत. गेल्या काही वर्षांत पावसाळ्यातील पावसाचे दिवस कमी झाले आहेत आणि अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, आपल्याकडे सिंचित जमीन फारच कमी असल्यामुळे बहुतांश शेतकरी पावसाच्या वेळापत्रकानुसारच खरिपाचे नियोजन करतात. असे असले, तरी हवामान विभागाच्या अंदाजावर हल्ली फारसे अवलंबून राहता येत नाही. कारण, अल निनोचा कमी-अधिक प्रभाव आणि बदलणारे वातावरण यामुळे पावसाचे आगमन मागे-पुढे होऊ शकते. तसेच प्रमाणही कमी-अधिक होऊ शकते. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ यामुळे पाऊस अधिकाधिक लहरी झाला आहे. यावर्षी अल निनो हा पावसावर प्रभाव टाकणारा मोठा घटक सक्रिय झाल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत पावसाच्या प्रमाणानुसार पिकांची निवड करणे आवश्यक ठरते. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार्‍या विभागांत कमी पाण्यावर येणारी पिके निवडणे गरजेचे आहे.

हवामानाचा लहरीपणा विचारात घेऊन संपूर्ण कृषी व्यवस्थाच हवामानावर आधारित करण्याची गरज व्यक्त होत आहे. हवामानाचा अंदाज घेऊनच शेतीतील कामांचे नियोजन करायला हवे. सुरुवातीला पाऊस पडून मध्येच काही दिवस खंडित झाला, तरी पिकांचे नुकसान होते. कोवळी पिके करपून जातात. त्यामुळे पाऊस केव्हा येणार आणि कधी उघडणार, याचा अंदाज स्थानिक पातळीवर घेऊनच नियोजन केलेले बरे! पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी हताश होऊन जातो. त्याला आत्मविश्वास देण्यासाठी हवामानावर आधारित कृषी व्यवस्था हाच पर्याय आहे. हवामानाचा अंदाज घेण्यासाठीची मॉडेल बदलली आहेत. अधिकाधिक अचूक पद्धतीने अंदाज कसा वर्तविता येईल, यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. ऐनवेळी पावसाच्या वाटचालीत येणारे अडथळे गृहित धरून नियोजन करणे आणि तज्ज्ञांनी त्यानुसार शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात सरासरी एक हजार मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु, तो सर्वत्र एकसमान पडत नाही. त्यामुळे जिल्हा पातळीवर खरीप पिकांच्या नियोजनासाठी ज्या बैठका होतात, त्यात हवामानावर आधारित नियोजन होऊन कृषी खात्यामार्फत शेतकर्‍यांना सातत्याने मार्गदर्शन होण्याची नितांत गरज आहे.
दुष्काळी भागात सामान्यतः फळबागा, फुलशेती, फळभाज्या अशी कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत. त्याचप्रमाणे शेवगा, आंबा, करवंदे, द्राक्षे यांचीही लागवड शेतकर्‍यांनी करायला हवी. जास्त पाणी लागणारी पिके अशा भागांमध्ये घेऊ नयेत. पावसाचा अंदाज घेऊनच शेतीची कामे करावीत. तसेच योग्य वेळी योग्य कामे उरकल्याने लागवडीच्या खर्चात बचत होते, हेही लक्षात ठेवायला हवे. पिकांना चांगला दर मिळणे शेतकर्‍याच्या हातात आता तरी नाही. परंतु, लागवड खर्च वाचविणे त्याच्या हातात निश्चितच आहे. पाण्याची हक्काची सोय असेल, तर केव्हाही पेरणी केली तरी चालू शकते. परंतु, कोरडवाहू जमिनीत किमान 70 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे चांगले. त्यामुळे उगवण व्यवस्थित होऊन पेरा वाया जाण्याचा धोका राहत नाही. वेगवेगळ्या पिकांसाठी खतांची वेगवेगळी मात्रा द्यावी लागते. तज्ज्ञांनी ज्या प्रमाणात शिफारस केली असेल, त्याच प्रमाणात पिकांना खते देणे इष्ट ठरते. मिश्रखतांची निवड योग्य ठरते. कारण, त्यामुळे खर्चात बचत होते आणि जमिनीला सर्व पोषक घटकही मिळतात. पावसाळा तोंडावर आलेला असताना खतांची आणि बी-बियाण्यांची दुकाने सजू लागतात. सर्व माध्यमांतून बियाण्यांच्या जाहिराती सुरू होतात. परंतु, जाहिरातींमध्ये केले जाणारे दावे योग्य असतातच असे नाही. त्यामुळे जाहिरातींना भुलून कोणत्याही बियाण्याची निवड करू नये. बियाणे नवीन असेल, तर केवळ दहा टक्के जागेतच ते लावावे.

संबंधित बातम्या

– जयदीप नार्वेकर, कृषी अभ्यासक

Back to top button