तडका : सेवाभावी सेवक | पुढारी

तडका : सेवाभावी सेवक

सेवाभावी सेवक

झारखंड राज्यामध्ये एका मंत्र्याच्या पीएच्या नोकराकडे पंचवीस कोटी रुपये सापडले, याचे तुम्हाला खूपच आश्चर्य वाटले असेल. साहजिकच आहे. या माणसाकडे एवढी मोठी रक्कम सापडावी म्हणजे आश्चर्य वाटावे असेच आहे. आम्हास मात्र याचे आश्चर्य वाटले नाही, याची जरूर नोंद घ्यावी मंडळी. हा देश किती समृद्ध झाला आहे, याचे हे उदाहरणच म्हणावे लागेल. आणि खरे तर तुम्हा-आम्हाला देशाच्या या प्रगतीचा अभिमानाच वाटला पाहिजे. अभिमान न वाटता आश्चर्य वाटते ही खरे तर कमालीची गोष्ट आहे. काय झाले असेल किंवा काय होऊ शकते, याचा थोडक्यात आढावा घेऊयात.

मंत्रिमहोदयांकडे या ना त्या रूपात करोडो रुपये येत असतात. हे सर्व पैसे ऑनलाईन घेण्याची सोय नसते, कारण हा सगळा काळा पैसा असतो. अशी कोट्यावधी रुपयांची माया गोळा करण्यासाठीच खरे तर मंत्रिपद हवे असते. खात्यामधील कर्मचार्‍यांच्या बदल्या, प्रमोशन, विविध प्रकारची टेंडर मंजूर करण्यापूर्वी मिळणारे करोडो रुपये हे सगळे ठेवायचे कुठे, हा या लोकांपुढे मोठा प्रश्न असतो. आजकाल ईडी, सीबीआय आणि तत्सम केंद्रीय संस्था बारकाईने सर्वत्र लक्ष ठेवून असतात. त्यात पुन्हा या संस्था सत्ताधारी पक्षाच्या हुकुमाप्रमाणे काम करतात, अशीही चर्चा असते.

समजा, एखाद्या मंत्र्याकडे 25 कोटी रुपये आले तर नेमके करावे काय, हा मोठाच प्रश्न त्याच्यापुढे उभा असतो. आजूबाजूला कार्यकर्त्यांची पिलावळ असते; पण त्यातील एकही विश्वासार्ह नसतो. ठेवायला दिलेले पैसे घेऊन तो कधी गायब होईल, याची शाश्वती नसते. सर्वात विश्वासार्ह माणूस म्हणजे 24 तास साहेबांच्या सोबत असलेला त्यांचा पीए असतो. असे अचानक आलेले पैसे ठेवण्यासाठी मंत्रिमहोदयांना दुसरा जवळचा माणूस दिसत नाही. पीएचे बिचार्‍याचे सगळे आयुष्य आणि उदरनिर्वाह साहेबांच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो. शिवाय बरेचसे पीए हे मंत्रिमहोदयांच्या उमेदीच्या, म्हणजे तरुण काळापासून सोबत असतात आणि आज आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये तेवढ्याच निष्ठेने साहेबांची सेवा करत आलेले असतात.

संबंधित बातम्या

मग असे अचानक आलेले 25 कोटी रुपये साहेब त्या पीएच्या हवाली करतात आणि ते सांभाळून ठेवण्यास सांगतात. साहेबांनी विश्वासाने दिलेले 25 कोटी रुपये कुठे ठेवावेत, हा पीएपुढेसुद्धा प्रश्न असतो. याचे कारण म्हणजे इतक्या वर्षांत साहेबांनी कोट्यवधीची मालमत्ता जमवली असेल, तर पीए महोदयांनीही लाखोंची मालमत्ता जमवलेली असते आणि तिचेच व्यवस्थापन करण्यामध्ये ते व्यस्त असतात. शिवाय केंद्रीय यंत्रणांची नजर त्याच्यावरही असते. मग आता त्याने ते 25 कोटी रुपये ठेवायचे कुठे, असा प्रश्न पीएपुढे उभा राहतो. त्याचे दुसरे, तिसरे घर, फार्म हाऊस हे सर्व नोटांनी आधीच भरलेले असते.

अचानक आलेल्या या प्रचंड मोठ्या धनाचे काय करायचे, असा प्रश्न त्याला पडतो, तेव्हा वर्षानुवर्षे आपली सेवा करणारा एक नोकर त्याला आठवतो. हा नोकर गरीब असतो, प्रामाणिक असतो आणि गेल्या कित्येक वर्षांपासून पीएसाहेबांना साथ देत असतो. आणि सर्व काही साहेबांसाठी त्याग करत असतो, हे विशेष!

Back to top button