लवंगी मिरची : महाविस्फोट | पुढारी

लवंगी मिरची : महाविस्फोट

मला एक सांग मित्रा, कालपासून चर्चा सुरू आहे की लोकसंख्या वाढ शाप आहे की, वरदान आहे? लोकसंख्येच्या बाबत आज आपण ‘ड्रॅगन’ला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झालो आहोत. या वाढत्या लोकसंख्येचे आपण काय करणार आणि पुढे देशाचे कसे होईल?

हे बघ, अमेरिकेची लोकसंख्या 34 कोटी आहे आणि आपली लोकसंख्या 143 कोटींच्या आसपास आहे. इथे जर आपण दोन्ही देशांच्या क्षेत्रफळाची तुलना केली, तर लक्षात येईल की, अमेरिका हा भारताच्या चौपट मोठा देश आहे आणि त्यांची लोकसंख्या भारताच्या फक्त चौथ्या भागा इतकी आहे. म्हणजे अशा वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या देशाची प्रगती होणे अत्यंत कठीण दिसते आहे. अवाढव्य क्षेत्रफळ असलेल्या रशियाची लोकसंख्या मात्र साडेचौदा कोटी आहे, तर पाकिस्तानसारख्या छोट्या देशाची लोकसंख्या 25 कोटी आहे. आपला शेजारी बांगलादेश 17 कोटीपेक्षा जास्त आहे, तर नायजेरिया साडेबावीस कोटी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, जेवढी गरिबी आहे तेवढी लोकसंख्येची वाढ जास्त आहे आणि जेवढी श्रीमंती आहे तेवढी लोकसंख्येची वाढ कमी आहे. बरोबर आहे यार, आपल्या समाजात पण असेच चित्र असते. आपण हिंदी चित्रपटात पाहत आलो आहोत की, श्रीमंत आणि धनाढ्य बापाला एकुलती एक मुलगी असते आणि हीरो जर गरीब असेल, तर त्याला किमान एखादा भाऊ आणि एक तरी बहीण असते.

आमचे एक शेजारी आहेत, ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. श्रीमंत आणि उच्चवर्गीय म्हणावे अशी कमाई आहे; पण ते एकाच मुलावर थांबले आहेत. सहज त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘दुसरे मूल मी अफोर्ड करू शकत नाही’. ही अफोर्ड काय भानगड आहे?
भानगड वगैरे काही नाही. साधे सोपे आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, असलेले उत्पन्न आणि मुलांवर आजकाल होणारा खर्च याचा मेळ बसत नसल्यामुळे आपण एकाच मुलावर थांबलो आहोत. गरिबांचे तसे काही नसते. ते स्वतःचे जगणेच अफोर्ड करू शकत नाहीत तेव्हा ते मुलांचे काय करणार? मग वारंवार मुले जन्माला घालून या देशाच्या लोकसंख्येमध्ये ते वाढ करत असतात.

संबंधित बातम्या

ते ठीक आहे; पण या पार्श्वभूमीवर चीनची स्टोरी मात्र सक्सेसफुल झाली आहे, असे दिसते. काही वर्षांपूर्वी त्यांनी एकच मूल हा सक्तीचा कायदा केला आणि तुला माहिती आहे का चीनमध्ये एकपक्षीय हुकूमशाही आहे. कायदा पाळावाच लागतो. त्यामुळे आज त्यांची लोकसंख्या आटोक्यात राहिली आहे. आपल्याकडे असा काही कायदा नसतो. म्हणजे साधे उदाहरण पाहा, तिसरे अपत्य असेल, तर तुम्ही सरपंचपदाची निवडणूक लढवू शकत नाहीत. आता अशा उमेदवाराला पहिल्या दोन मुली असतील, तर त्याच्यावर घरातून दबाव असतो. वंशसातत्य टिकून राहावे आणि म्हातारपणीची काठी म्हणून मुलगा होऊ द्या, असे त्याची बायको, आई-वडील, कुटुंबीय त्याच्या मनावर ठसवत असतात.

Back to top button