युक्रेन युद्धाचा असाही धडा | पुढारी

युक्रेन युद्धाचा असाही धडा

हेमंत महाजन, ब्रिगेडियर (निवृत्त)

जगभरात सध्या युद्धज्वर वाढला आहे. राष्ट्रांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा आणि त्यांना फुंकर घालून स्वतःचे ईप्सित साध्य करून घेणार्‍या महाशक्तींमुळे संघर्षाचे प्रसंग सातत्याने उद्भवत आहेत. सध्या रशिया, युक्रेन, युरोप आणि इतर देशांत युद्धासाठी सैनिकांची कमतरता भासत आहे. आपल्याकडे सैन्य भरती म्हटली म्हणजे हजारो युवक येतात; पण फारच थोड्या युवकांचा सैन्यात नंबर लागतो. तरीही चीन किंवा पाकिस्तानविरुद्ध चालणार्‍या प्रदीर्घ महायुद्धाकरिता मोठ्या संख्येने सैनिकांची गरज भासणार आहे.

एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाच्या क्रांतीबरोबरच युद्धसंघर्षांमुळेही ओळखले जाते की काय, अशी सध्याची एकंदर स्थिती आहे. सुदैवाने भारत या सर्व परिस्थितीपासून दूर असला तरी शेजारी देशांचे उपद्व्याप आणि धोरणे पाहता भविष्यकाळात काय होईल, याची शाश्वती नाही. या पार्श्वभूमीवर भारताने आता सुरू असलेल्या युद्धसंघर्षांमधून सातत्यपूर्णतेने धडे घेत राहिले पाहिजे. युक्रेन-रशिया आणि इस्रायल-हमास! या युद्धभूमीवर विविध प्रकारची शस्त्रे, तंत्रज्ञान वापरले जात आहे. या युद्धभूमी प्रयोगशाळा बनल्या आहेत. कुठले तंत्रज्ञान अधिक प्रभावी आहे आणि कुठले नाही, हे स्पष्ट होत आहे. महागडी लढाऊ जहाजे, लढाऊ विमाने, रणगाडे हे पांढरे हत्ती बनले आहेत. शत्रूची जहाजे, लढाऊ विमाने, रणगाडे, मोठी शस्त्रे, जी आकाशातून ओळखता येतात, त्यांना लांबून क्षेपणास्त्र फायर करून नष्ट करता येते; मात्र या युद्धात पुन्हा सिद्ध झाले आहे की, शस्त्रे आणि शस्त्र चालवणारा सैनिक यामध्ये सैनिक हा अधिक महत्त्वाचा आहे.

आजघडीला जगातील आघाडीची सामरिक महासत्ता असणार्‍या रशियामध्ये लढण्यासाठी लढाऊ युवकांची कमी पडत आहे; कारण श्रीमंत रशियन पहिलेच रशिया सोडून युरोप आणि अन्यत्र पळून गेलेले आहेत. अनेक रशियन युवक सैन्यात भरती व्हायचे नाही म्हणून देशामध्ये कुठेतरी लपून बसलेले आहेत. सैनिकांच्या बाबतीत युक्रेनची परिस्थितीही फारशी चांगली नाही. तिथेही लढणार्‍या सैनिकांची कमी पडत आहे; कारण हजारो जण या युद्धात आतापर्यंत मारले गेले किंवा जखमी झाले आहेत. युक्रेनचे अनेक नागरिक विविध कारणे काढून निर्वासितांबरोबर युक्रेनच्या बाहेर पळून गेले आहेत.

दोन वर्षांपूर्वी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले, तेव्हा असा प्रचार करण्यात आला होता की, युक्रेनचे नागरिक हे देशावर जास्त प्रेम करतात व देशाकरिता लढण्यासाठी सदैव तयार असतात; मात्र हे काही प्रमाणातच सत्य आहे. याचे कारण सद्यःस्थितीमध्ये युक्रेनमधील अनेक नागरिक स्वतःचा प्राण वाचवण्यामध्येच गुंतलेले आहेत. युक्रेनच्या सैनिकांचे सरासरी वय आहे 45 वर्षे. याचाच अर्थ तरुणांऐवजी मध्यमवयीन सैनिक युद्धभूमीवर जास्त आहेत. 45 वर्षांच्या मध्यमवयीन सैनिकाची जर पंचवीस वर्षीय तरुण सैनिकाशी चकमक झाली तर काय होईल? अर्थातच तरुण सैनिक जिंकेल; परंतु युरोपमधल्या अनेक लहान देशांत सैन्यात जाण्याकरिता तरुण मंडळीच उरलेली नाहीत.

चीनचीही अवस्था अशीच दयनीय आहे आणि चिनी नागरिकही सैन्यामध्ये जायला तयार नाहीत. बहुतेक चिनी नागरिक हे श्रीमंत मध्यमवर्गीय झाले आहेत आणि यामुळे शहरातील युवक, जे तिबेटसारख्या युद्धभूमीवर जायला तयार नाहीत. सध्या चीनबरोबरचा संघर्ष हा लडाख, अरुणाचल, सिक्कीममध्ये होत आहे. या युद्धभूमीवर आधुनिक शस्त्रांचा फारसा उपयोग नाही. इथल्या सैनिकांमध्ये ताकद, सहनशीलता आणि विविध कठीण परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती, कठीण परिस्थितीत तग धरण्याची क्षमता यांची गरज आहे. भारतीय सैन्यात हे गुण आढळतात. चीनच्या लष्करी ताकदीविषयी अनेक तज्ज्ञांकडून सातत्याने सांगितले जाते की, चीनचे सैन्य जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात ताकदवान सैन्य आहे.

त्यांची शस्त्रास्त्रे अत्याधुनिक आहेत. या बाबी खर्‍या मानल्या तरीही एक गोष्ट विसरता कामा नये की, या सर्व साधनांच्या मदतीने प्रत्यक्ष लढाई लढतात ते सैनिक आणि सैन्याधिकारी. उत्तम आधुनिक शस्त्रास्त्रे सैन्याची क्षमता वाढवतात; परंतु या क्षमतेचा वापर करायचा की नाही किंवा तो कार्यक्षमपणे कसा करायचा, यासाठी आवश्यक असते ती इच्छाशक्ती. चिनी सैन्याकडे नेमकी याचीच कमतरता आहे. चीनमध्ये सैनिक आणि अधिकार्‍यांमध्ये दुरावा आहे. भारतीय सैन्याधिकारी आणि सैनिकांमध्ये संबंध उत्तम आहेत. ते बटालियन किंवा रेजिमेंटला स्वतःचे दुसरे घरच समजतात. गलवानमध्ये आपले कमांडिंग अधिकारी कर्नल बाबू यांच्यावर चिनी सैनिकांनी हल्ला केला, तेव्हा कुठल्याही परिणामांचा विचार न करता संख्येने कमी असलेल्या भारतीय सैनिकांनी चिन्यांवर हल्ला करून त्यांना रक्तबंबाळ केले.

काही वर्षांपूर्वी नाथू ला या खिंडीपाशी भारतीय आणि चिनी सैन्य एकमेकांपासून खूपच जवळ आले होते. तिथे आलेला एक अनुभव यानिमित्ताने आवर्जून सांगावासा वाटतो. एकदा या भागात चीनचे सैनिक मोठ्या आवाजात आनंदोत्सव साजरा करत होते.

दुसर्‍या दिवशी त्यांना विचारणा झाली असता

त्यांनी सांगितले की, तिथे असलेली कंपनी किंवा सैन्यगट आता तिथून परत जात आहे. त्यांचे चिनी सैन्यातील काम संपले आहे. ते आता पुन्हा चीनमध्ये परत जातील आणि आवडीचे काम पत्करतील. त्यावेळी लक्षात आले की, जे चिनी सैन्य सीमेवर येणे याला शिक्षा समजतात, असे सैनिक कसे लढतील आणि प्राण कसे देतील, याविषयी वेगळे बोलण्याची गरज नाही. त्यामुळे भारताने सामरिक सामर्थ्याचा कणा असणार्‍या सैन्याच्या बळकटीसाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

Back to top button