चीन ची डोकेदुखी | पुढारी

चीन ची डोकेदुखी

चीन खूपच खूश आहे कारण वरकरणी बघितले, तर अमेरिकेची जी नाचक्की अफगाणिस्तानात झाली आहे. कारण, चीन मागल्या दोन दशकांपासून अमेरिकेशी जागतिक महाशक्ती म्हणून स्पर्धा करण्यात रमला; पण अजून तरी तितक्या उंचीवर चीनला पोहोचता आलेले नाही आणि आपला दबदबा दक्षिण मध्य आशियातही निर्माण करता आलेला नाही. भारत आता कुठे आपल्या पायावर उभा राहत आहे आणि कुठलाही अत्यंत आक्रमक पवित्रा न घेता वाटचाल करत आहे; पण त्या भारताचीही भीती चीनला सतावत असते आणि भारताला लडाखमध्ये शह देताना चीनची दमछाक होत आहे.

उलट दक्षिण चीन वा आग्नेय आशियामध्ये भारतासहीत जपान, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेची चौकडी उभी करून भारतानेच चीनला शह दिला आहे; मात्र पाकिस्तान आणि तिथल्या जिहादी दहशतवादाला खतपाणी घालूनही चीन भारताला दबावाखाली आणू शकलेला नाही. एकूण अशा पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानात अमेरिकेला युद्ध साहित्य टाकूनच पळ काढावा लागला, याचा चीनला आनंद झाला, तर नवल नाही; पण अमेरिकेचे नुकसान वा नामुष्की म्हणजे चीनचा लाभ असू शकत नाही, तरीही वरवर बघता चीन आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहे. जणू तालिबानने अफगाणिस्तान काबीज केला म्हणजे चीननेच बाजी मारली, अशा थाटात चीनमधल्या प्रतिक्रिया आहेत.

त्यातला अमेरिकेचा उपहास खरा असला, तरी त्यातून लाभांऐवजी चीनसाठी समस्या उभ्या राहणार आहेत; मात्र आज तरी त्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेलेले नाही. पहिली गोष्ट म्हणजे सोव्हियत व अमेरिका अशा दोन बलाढ्य महाशक्ती व सैन्यांना तालिबान वा अफगाण जिहादींनी जेरीस आणलेले असल्याने त्यांच्या लेखी चिनी लालसेना भयावह उरलेली नाही. कदाचित लवकरच कुठली तरी कुरापत निघेल आणि चीनच्या सीमेवर तालिबान्याांचा उच्छाद सुरू होईल, ही भीती पूर्णत: वास्तविक आहे. कारण, अफगाण व चिनी सीमेवर उग्येर मुस्लिमांची संख्या कोट्यवधी आहेच.

संबंधित बातम्या

त्यापेक्षा हे सर्व मुस्लिम चिनी कम्युनिस्टांच्या अत्याचारांना कंटाळले असून, त्यापैकी अनेकांनी बंडसुद्धा पुकारले आहे. त्यांचे अनेक गट चिनी लालसेनेला सतत पोलादी टाचेखाली दडपून ठेवावे लागत असतात. तालिबान्यांच्या विजयाने त्या चिनी जिहादी गटांना व बंडखोरांना स्फुरण चढले, तर ती चीनसाठी कायमची डोकेदुखी होऊन जाणार आहे. त्याबाबतीत अमेरिकन सेना अफगाण भूमीत असताना खूप सुरक्षा होती. त्यामुळेच ग्वादार बंदर वा सीपेक नावाच्या पायाभूत प्रकल्पात चीनने केलेली गुंतवणूक सुरक्षित होती. आता त्या सुरक्षेलाच मोठे ग्रहण लागण्याची शक्यता अनेकपटींनी वाढली आहे.

बुश, ओबामा, ट्रम्प व बायडेन या चार राष्ट्राध्यक्षांची कारकीर्द आणि हजारो सैनिकांच्या बळीबरोबरच अब्जावधी डॉलर्सचा चुराडा करूनही अमेरिकेला अफगाणिस्तानात आलेले अपयश, त्यांच्या शत्रूला आनंदित करणारे आहे; पण अमेरिकन सेना तिथे असल्याचा लाभ त्यांनाही होता, ते सुरक्षा कवच संपल्याची जाणीव चीनला हळूहळू होत आहे. त्यातूनच उग्येर मुस्लिम आणि तुर्कमेनिस्तान व तत्सम वंशाच्या चिनी प्रदेशातील वंशवादाने भारावलेल्यांना स्फुरण चढले, ही मोठी समस्या आहे.

आजवर त्यांना अफगाण भूमीत आश्रय नव्हता; पण आता तालिबान्यांच्या एकूणच इस्लामी धर्मबंधुत्वाचा आधार घेऊन हे चिनी घातपाती, जिहादी व बंडखोर सीमेपलीकडे आश्रय घेऊन लालसेनेसह चीनच्या प्रगतीला खीळ घालू शकतात. त्यांना सीमा बंद राखण्यासाठी तालिबान्यांची मदत मागायची, तर पाकची मध्यस्थी आवश्यक आहे आणि ती मध्यस्थी म्हणजे ‘हात ओले’ करणे असते. तालिबान्यांना नित्यनेमाने खंडणी देण्याखेरीज त्यांच्यासमोर पर्याय नाही. अर्थात, खंडणी भरली वा पैसे खर्चले म्हणून तालिबान्यांचे अराजकी सरकार शब्दाला जागण्याची खात्री कोणी देऊ शकत नाही. हा झाला पश्चिम सीमेवरील चीनचा प्रश्न; पण त्या देशासाठी तो तितकाच नाही. पूर्वेला त्यांचा तैवान, इंडोनेशिया, फिलिपाईन्स वा ऑस्ट्रेलिया अशा देशांशी सागरी सीमेवरून संघर्ष चालला आहे. त्यातला मोठा सहकारी अमेरिका असून तीच अमेरिका अफगाणिस्तानच्या जबाबदारीतून मोकळी झाल्याने सर्व शक्ती वा ताकद दक्षिण चिनी सागरात लक्ष केंद्रित करू शकते. थोडक्यात, अमेरिकेचा अफगाण पराभव, हा राजकीय खुशीचा विषय असला, तरी पूर्व सीमेवरील समस्या चीनसाठी अधिक मोठी डोकेदुखी उभी करणारा विषय आहे.

सध्या सगळ्या जगाचे लक्ष काबूलचे स्फोट व अफगाण भूमीत अडकलेले परदेशी नागरिक यातच गुंतलेले असल्याने चिनी समस्येकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही. जसजसे दिवस जातील व अमेरिकेची नाचक्की हा विषय मागे पडेल आणि तालिबानी आपले बस्तान बसवतील, तेव्हा खर्‍या समस्या डोके वर काढणार आहेत. अफगाण-पाक सीमा व त्यालगत चीनने केलेली अफाट गुंतवणूक, जिहादी व तालिबान्यांच्या रडारवर येणार आहे. चीनला त्याची पूर्ण जाणीव आहे; मात्र त्याची उघड वाच्यता होताना दिसत नाही. त्यापेक्षा तत्सम मंडळी तालिबान सत्ता भारताला किती संकटात ढकलू शकते, त्यावर डांगोरा पिटत आहेत. म्हणूनच वरकरणी अफगाण युद्धातून अमेरिकेने तडकाफडकी घेतलेली माघार व गुंतलेल्या अब्जावधी डॉलर्सवर युद्ध साहित्यासह सोडलेले पाणी म्हणजे पराभव आहे की हेतूपूर्वक योजलेली घातपाती योजना आहे, असा प्रश्न पडतो. चीनला सर्वात भयंकर अशा जिहादी खाईत लोटून देण्याचे हे अमेरिकन कारस्थान तर नाही?

Back to top button