Chandrayaan-3 | ‘विक्रम’ लँडर, ‘प्रज्ञान’ रोव्हरची चंद्राच्या पृष्ठभागावर विश्रांती, हाय-रेझोल्यूशन फोटो आले समोर | पुढारी

Chandrayaan-3 | 'विक्रम' लँडर, 'प्रज्ञान' रोव्हरची चंद्राच्या पृष्ठभागावर विश्रांती, हाय-रेझोल्यूशन फोटो आले समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने चांद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर विसावलेल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच्या चित्तथरारक हाय-रेझोल्यूशन प्रतिमा टिपल्या आहेत. १५ मार्च २०२४ रोजी या प्रतिमा टिपल्या आहेत.

स्वतंत्र संशोधक चंद्र तुंगातुर्थी यांच्याद्वारे प्रक्रिया केलेल्या या नवीन प्रतिमा २३ ऑगस्ट २०२३ रोजीच्या चंद्रावरील ऐतिहासिक लँडिंगनंतर इस्रोने शेअर केलेल्या सुरुवातीच्या प्रतिमांपेक्षा अधिक तपशीलवार दिसतात. या प्रतिमा सुमारे ६५ किलोमीटरच्या कमी उंचीवरून घेण्यात आल्या आहेत. ज्यामुळे प्रति पिक्सेल सुमारे १७ सेंटीमीटर रिझोल्यूशन मिळते. २६ सेंटीमीटर प्रति पिक्सेल रिझोल्यूशनसह १०० किमीच्या नियमित उंचीवर टिपलेल्या सुरुवातीच्या लँडिंगनंतरच्या प्रतिमेच्या तुलनेत या अगदी जवळून घेण्यात आल्या आहेत.

प्रतिमांच्या दोन संचांचे शेजारी शेजारी निरीक्षण करताना रेझोल्यूशनमधील फरक स्पष्टपणे दिसून येतो. यात प्रज्ञान रोव्हर स्पष्टपणे दिसतो. भारताचा हा छोटा रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ फिरणारा पहिला रोव्हर आहे.

यावरून आता हे स्पष्ट झाले आहे की इस्रो चंद्राचा पृष्ठभाग १६-१७ सेंटीमीटरच्या अभूतपूर्व रेझोल्यूशन पातळीवर टिपून आपली क्षमता वाढवत आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी ‘चांद्रयान- ३’चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या लँडिंग झाले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या पार पडलेली चांद्रयान-३ मोहीम भारतासाठी एक महत्त्वाचा ठरली. कारण दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला आणि रशिया, अमेरिका आणि चीन नंतर अंतराळ यानाला सॉफ्ट लँडिंग करणारा भारत चौथा देश ठरला.

रोहर आणि लँडरने यशस्वी कामगिरी करून चंद्रावरील वातावरण आणि खनिजाची माहिती ‘इस्रो’ला पाठविली. त्यानंतर विक्रम आणि प्रज्ञान स्लिप मोडमध्ये गेले.

चांद्रयान-३ (Chandrayaan-3) चे विक्रम लँडर चंद्रावर ज्याठिकाणी उतरले त्या बिंदूला ‘शिव शक्ती’ असे नाव देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. दरम्यान. याला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने (IAU) अधिकृतरित्या मान्यता दिली आहे.

हे ही वाचा :

Back to top button