Google चा मोठा निर्णय, २०० कर्मचारी कपात, पण भारत, मेक्सिकोत भरती करणार | पुढारी

Google चा मोठा निर्णय, २०० कर्मचारी कपात, पण भारत, मेक्सिकोत भरती करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगलने (Google) त्यांच्या ‘कोअर’ टीममधून किमान २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. दरम्यान, गुगल भारत आणि मेक्सिकोमध्ये या नोकऱ्यांसाठी भरती करणार आहे. Google च्या पहिल्या तिमाहीतील कमाईच्या अहवालापूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त CNBC ने दिले आहे.

गुगलने एकीकडे त्यांच्या महत्त्वाच्या आणि इंजिनिअरिंग टीममधून नोकरकपात केली असली तरी युनिटच्या पुनर्रचनेचा एक भाग म्हणून कंपनी मेक्सिको आणि भारतात संबंधित पदांसाठी भरती करणार आहे.

Google ने त्याच्या Flutter, Dart आणि Python टीममधून कर्मचाऱ्यांना याआधीच काढून टाकले आहे. त्यानंतर सुमारे दोन दिवसांनी पुन्हा नोकरकपातीची घोषणा केली. नोकरकपात केलेली ५० पदे ही सनीवेल, कॅलिफोर्निया येथील कंपनीच्या अभियांत्रिकी विभागातील आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे.

गुगल डेव्हलपर इकोसिस्टमचे उपाध्यक्ष असीम हुसेन यांनी या नोकरकपातीची घोषणा केली आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला होता. त्यांनी कर्मचाऱ्यांना म्हटले आहे की, या वर्षातील त्यांच्या टीमसाठी ही सर्वात मोठी नियोजित नोकरकपात होती.

“जागतिक स्तरावर उच्च-वाढीच्या ठिकाणी विस्तार करत असताना आमचा सध्याचा जागतिक ठसा कायम ठेवण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून आम्ही आमच्या भागीदार आणि विकासक समुदायांच्या जवळ काम करू शकू.” असे हुसेन यांनी ईमेलमध्ये नमूद केले आहे.

Google च्या वेबसाइटनुसार, ‘कोअर’ टीम कंपनीच्या प्रमुख उत्पादनांसाठी तांत्रिक पाया मजबूत करते.

जगभरात नोकरकपात कायम

जगभरात अनेक मोठ्या कंपन्यांनी नोकरकपात सुरुच ठेवली आहे. दरम्यान, रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, टेस्लाने टेक्सास आणि कॅलिफोर्नियामधील ६,०२० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखली आहे. त्यांच्या उत्पादनांची घटलेली मागणी आणि नफा कमी झाल्याने ही नोकरकपात केली जात आहे. विक्रीतील घट आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत वाढलेली स्पर्धा यामुळे कंपनीवरील वाढत्या दबावादरम्यान नोकरकपात केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

 हे ही वाचा :

 

Back to top button