जुन्या पेन्शनसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा | पुढारी

जुन्या पेन्शनसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेखाली घोषित केलेले लाभ आणि फायदे लागू केले नसल्याच्या निषेधार्थ देशातील रेल्वे व सरकारी कर्मचारी पुढील दोन महिन्यानंतर बेमुदत संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनच्या नवी दिल्लीतील ताल कटोरा स्टेडियममध्ये गुरुवारी झालेल्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय पेन्शन योजनेतील (एनपीएस) त्रुटी दूर करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकारने संयुक्त समिती गठीत केली आहे. या समितीचा अहवाल येईपर्यंत पुढील दोन महिने आम्ही वाट बघणार आहोत. त्यानंतर सर्व कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी बेमुदत काळासाठी संपावर जातील, असा इशारा रेलवे मेन्स फेडरेशनच्या अधिवेशनात देण्यात आला.

यापूर्वी १ मे रोजी संपावर जाण्याचा निर्णय रेल्वे कर्मचाऱ्यांनी घेतला होता. तो निर्णय मागे घेऊन संयुक्त समितीचा अहवाल आल्यानंतर संपावर जाण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. या अधिवेशनात ८ प्रस्तावांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. देशभरातील १५०० प्रतिनिधी आणि सुमारे ३ हजार सदस्य अधिवेशनाला उपस्थित होते. एआयआरएफचे सर्व पदाधिकारी, क्षेत्रीय सचिव, आयटीएफ इनलँड ट्रान्सपोर्ट रेल्वे सेक्शनच्या स्ट्रेटिजिक प्लानर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button