राज्यातील SMEs साठी निधी उभारणी, NSE आणि महाराष्ट्र सरकारमध्ये सामंजस्य करार | पुढारी

राज्यातील SMEs साठी निधी उभारणी, NSE आणि महाराष्ट्र सरकारमध्ये सामंजस्य करार

पुढारी ऑनलाईन : राज्यातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी ‘IPO’ यंत्रणेद्वारे निधी कसा उभा करावा? याबाबत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) एक सामंजस्य करार केला आहे. एनएसई हे भारतातील आघाडीचा स्टॉक एक्स्चेंज आहे. यासाठी एनएसई इमर्ज (NSE Emerge) याचा वापर करण्यात आला.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विकास आयुक्त, उद्योग दीपेंद्र सिंह कुशवाह महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे सहयोगी उपाध्यक्ष जयेश ताओरी यांच्यात नुकतेच पुणे येथे सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली. या करारानुसार, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने निधी उभारणीसाठी राज्यभरातील कॉर्पोरेट्सना मार्गदर्शन करण्यासाठी एनएसई परिसंवाद, एमएसएमई शिबिरे, ज्ञान सत्र, रोड शो, कार्यशाळा याद्वारे जनजागृती मोहीम राबवेल. हे मार्गदर्शन एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्म आणि सूची प्रक्रियेत असलेल्या हँडहोल्ड कंपन्यांच्या साहाय्याने अर्थसहाय्य मिळवण्यासाठी असेल.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या राज्यातील एमएसएमईंना, त्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर देत आहोत. MSMEs अधिक सक्षम करण्यासाठी तसेच एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मद्वारे भांडवली बाजार टॅप करण्यासाठी आणि राज्य एमएसएमईएसला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंज सोबत सामंजस्य करार केला आहे. एनएसई इमर्ज हे या छोट्या उद्योगांना गुंतवणुकीचा एक पर्याय निर्माण करून देते. विश्वासार्हता मिळवण्याबरोबरच सार्वजनिक भांडवलाचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून, स्टॉक एक्स्चेंजवर सूचीकरणाची प्रक्रिया, फायदे आणि बारकावे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आम्ही एमएसएमईएसमधील जागरूकता मोहिमा संयुक्तपणे राबवू.”

एनएसईचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराम कृष्णन म्हणाले, “आज महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांनी एमएसएमईच्या वाढीस सहकार्य आणि समर्थन देण्यासाठी एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मद्वारे सामंजस्य करार केला आहे. एनएसई इमर्ज एसएमईला कार्यक्षमरीतीने भांडवल उभारण्यास आणि स्टॉक एक्स्चेंजवरील सूचीवर त्यांची उपस्थिती दाखवण्यास सक्षम करते. आम्ही सरकारच्या सहकार्याने राज्यातील एमएसएमईसाठी जागरुकता सत्र आयोजित करू आणि निधी उभारणीच्या प्रक्रियेची माहिती देऊ. आम्ही राज्यातील एमएसएमईंना पुढे येण्याचे आवाहन करतो आणि त्यांनी एनएसई इमर्जद्वारे वित्तपुरवठ्याच्या नवीन स्त्रोताचा लाभ घ्यावा.”

सध्या विविध क्षेत्रातील ४२४ कंपन्या एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध आहेत आणि त्यांनी एकत्रितपणे ८,८३६ कोटी रुपये उभारले आहेत. या कंपन्यांच्या बाजार भांडवलाने अलीकडेच १ लाख कोटींचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.

हे ही वाचा :

Back to top button