EPFO | ६ कोटी पगारदार नोकरवर्गासाठी मोठी बातमी! पीएफ व्याजदरात वाढ

EPFO | ६ कोटी पगारदार नोकरवर्गासाठी मोठी बातमी! पीएफ व्याजदरात वाढ

पुढारी ऑनलाईन : पगारदार नोकरवर्गासाठी मोठी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) २०२३-२४ साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याजदर निश्चित केला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) २०२३-२४ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यांसाठी ८.२५ टक्के व्याजदर निश्चित केला आहे, असे पीटीआयने शनिवारी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. गेल्या वर्षी २८ मार्च रोजी EPFO ​​ने २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (EPF) ८.१५ टक्के व्याजदर जाहीर केला होता. आता व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.

"सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज, EPFO ​​च्या २३५ व्या बैठकीत आज शनिवारी २०२३-२४ साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी ठेवींवर ८.२५ टक्के व्याजदराची शिफारस केली आहे. देशातील कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे." असे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा पगारदार कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य योगदान आहे. याव्यतिरिक्त नियोक्त्यांनी (employers) EPF खात्यात संबंधित योगदान देणे आवश्यक आहे. सरकारी सेवानिवृत्ती निधीचे सुमारे ६ कोटी सदस्य आहेत.

दर महिन्याला पगारदार कर्मचारी त्यांच्या कमाईच्या १२ टक्के त्यांच्या EPF खात्यात योगदान देतात, तर संपूर्ण रक्कम खात्यात जमा केली जाते. दरम्यान, नियोक्ता ३.६७ टक्के रक्कम EPF खात्यात जमा करतात. उर्वरित ८.३३ टक्के कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये (EPS) वितरीत केली जाते. नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) खात्यात ०.५० टक्के योगदानदेखील देतो.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news