मध्य प्रदेशमध्‍ये अवैध फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन ठार, १० जखमी | पुढारी

मध्य प्रदेशमध्‍ये अवैध फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन ठार, १० जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्य प्रदेशमधील दमोह येथील अवैध फटाक्‍यांच्‍या कारखान्‍यात आज ( दि.३१) दुपारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत तीन जण ठार झाले असून १० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

दमोह येथील दाट लोकवस्तीच्या परिसरात बेकायदा फटका कारखाना सुरू होता. येथे दिवाळीसाठी फटाके मोठ्या प्रमाणात बनवले जात असल्याचे स्‍थानिकांनी सांगितले. स्फोटात फटाका व्‍यापारी अभय गुप्‍ता यांचा मृत्‍यू झाला आहे. जिल्हाधिकारी आणि एसपींसह मोठ्या संख्येने प्रशासकीय फौज, पोलीस आणि मदत बचाव अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.  गंभीर जखमी झालेल्या १० हून अधिक जणांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेबात जिल्हाधिकारी मयंक अग्रवाल म्हणाले की, “शहराच्या मध्यभागी असलेल्या एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले असून, त्‍यांच्‍यावर उपचार सुरू आहेत. चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल.”

‘एएनआय’शी बोलताना दमोहचे पोलीस अधीक्षक सुनील तिवारी यांनी सांगितले की, ” शहरातील पुराण पुल परिसरात एक कारखाना बेकायदेशीरपणे चालवला जात होता ज्यामध्ये फटाके तयार केले जात होते. मंगळवारी येथे स्फोट झाला, ज्यामुळे इमारतीचे छत कोसळले. आणि काही लोक त्याच्या ढिगाऱ्यात गाडले गेले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.” घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. हा कारखाना पूर्णपणे बेकायदेशीर होता कारण वसाहतींच्या मध्यभागी फटाके तयार करण्यास परवानगी देण्यासाठी परवाने कधीही दिले गेले नाहीत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

 

Back to top button