Lok Sabha Election 2024 | भाजपने बहुमताचा आकडा न गाठल्यास प्लॅन B काय?; अमित शहांचा मोठा खुलासा | पुढारी

Lok Sabha Election 2024 | भाजपने बहुमताचा आकडा न गाठल्यास प्लॅन B काय?; अमित शहांचा मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपला ४०० हून अधिक जागा ह्या संविधानामध्ये बदल करण्यासाठी जिंकायच्या असल्याचा आरोप काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून केला जात आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. संविधानात बदल करण्यासाठी भाजपला लोकसभेच्या ४०० हून अधिक जागा जिंकायच्या असल्याचा विरोधकांचा आरोप अमित शहा यांनी फेटाळून लावला आहे. ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, भाजपला गेल्या दशकभरात संविधानात बदल करण्यासाठी जनादेश होता, मात्र आम्ही तसे केले नाही.

“गेल्या १० वर्षांत संविधान बदलण्यासाठी आमच्याकडे बहुमत होते. पण आम्ही तसे कधीच केले नाही. बहुमताचा दुरुपयोग करण्याचा इतिहास हा माझ्या पक्षाचा नाही. इंदिरा गांधींच्या काळात बहुमताच्या दुरुपयोग करण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे.” असा पलटवार अमित शहा यांनी विरोधकांवर केला आहे.

‘भाजपने बहुमताचा आकडा गाठला नाही तर प्लॅन बी तयार आहे का?’ यावर अमित शहा यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिले आहे. “जेव्हा प्लॅन ए यशस्वी होण्याची ६० टक्क्यांपेक्षा कमी संधी असते तेव्हा प्लॅन बी बनवणे आवश्यक आहे. मला खात्री आहे की, पंतप्रधान मोदी प्रचंड बहुमताने सत्तेवर येतील…” असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला आहे.

कलम ३७० रद्द, राममंदिराची उभारणी

गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० रद्द करणे आणि राम मंदिराचे बांधकाम यासारख्या आश्वासनांची पूर्तता केली असल्याचे सांगत भाजपच्या कामगिरीवर जोर दिला. “आम्ही कलम ३७० रद्द केले. तिहेरी तलाक प्रथा संपुष्टात आणली आणि अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम हाती घेतले. आम्ही आमच्या गेल्या दहा वर्षांच्या शासनकाळात जनादेशाच्या आधारावर समान नागरी कायदा (UCC) आणला,” असेही ते म्हणाले.

‘४०० पार’चे काय होणार?

भाजपचे यावेळी ‘४०० पार’ अशी घोषणा दिली आहे. या घोषणेबद्दल विचारले असता अमित शहा यांनी, एका मोठ्या पाऊलासाठी ते आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ४०० पार आणि २७२ मध्ये फारसा काही फरक नाही आणि भाजप केवळ विस्तार झालेला हवा आहे. “आम्हाला कधीही एक मोठा टप्पा गाठण्यासाठी ४०० जागांची गरज नव्हती; आम्ही ते आता करू शकतो. भाजप स्वतःचा विस्तार करणार नाही का?” असेही त्यांनी नमूद केले आहे.

हे ही वाचा :

Back to top button