पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल सीईटी सेल कक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनमध्ये निकालाचे गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. या गुणावरच एमबीए प्रवेश होणार आहे. तब्बल दोन महिने निकाल जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांना चिंता होती. बुधवारी निकाल जाहीर केला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत 9 ते 11 मार्च राज्य व राज्याबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 1 लाख 52 हजार 999 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 178 परीक्षा केंद्रावर 1 लाख 38 हजार 683 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सदर परीक्षा एकूण 178 परीक्षा केंद्रावर घेण्यात आली आहे.
सीईटी सेलच्या वतीने यावर्षी परीक्षा संदर्भात आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. यामध्ये 415 विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले होते. त्यापैकी (युनिक) आक्षेप 99 होते. सर्व आक्षेपांचे निराकरण करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्याच्या लॉग इन मध्ये गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली होती. गतवर्षी 1 लाख 30 हजार 927 विद्यार्थ्यांनी सीईटीला नोंदणी केली होती. त्यापैकी सीईटी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 320 संस्थात असलेल्या 42 हजार 511 जागापैकी 33 हजार 340 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. दरम्यान सीईटी सेलच्या वतीने 13 परीक्षा आतापर्यंत झाल्या आहेत. यापैकी 10 अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये बी.एड, एमएड, बीपीएड, एमपीएड, विधी पाच वर्ष आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे.
हेही वाचा