तडका : नेत्यांचा नवा फंडा..! | पुढारी

तडका : नेत्यांचा नवा फंडा..!

सध्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी विविध तंत्रे वापरली जात आहेत. रॅली, सभा, प्रत्यक्ष चिन्ह वाटप करणे याशिवाय 10 दहा वर्षांपासून रोड शो चांगल्यापैकी लोकप्रिय झाले आहेत. लोक कुणाला पाहायला गर्दी करतील, याचा काही नेम नाही. एखादा हिरो किंवा एखादी हिरोईन रस्त्याने जात असेल, तर तिला किंवा त्याला पाहण्यासाठी लोक भरपूर येतात. काही ठिकाणी हिरो आणि काही ठिकाणी नायिकापण थेट इलेक्शन लढवत आहेत. उदाहरणार्थ सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा हे या निवडणुकीत पश्चिम बंगालमधील एका मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत. हिमाचल प्रदेशमधून कंगना राणौत ही तेजतर्रार अभिनेत्री मंडी या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. अभिनेते गोविंदा हेही प्रचारात आघाडीवर आहेत. ज्या लोकांना सातत्याने रोज टीव्हीवर पाहतो, त्यांचा रोड शो पाहण्यासाठी लोक गर्दी का करत असतील? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

सर्वात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की रोड शो हा तुलनात्मकद़ृष्ट्या कमी खर्चाचे निवडणूक प्रचारतंत्र आहे. जो उमेदवार निवडणूक लढवत आहे, त्याच्याबद्दल स्थानिक मतदारांना फारसे अप्रूप नसते कारण तो नेहमीचा पाहण्यातील असतो. हा जो उमेदवार रिंगणात उभा आहे, त्याला येनकेनप्रकारे आपले चिन्ह लोकांपर्यंत न्यावयाचे असते. मग त्याच्याकडून ज्या लोकांना चांगल्यापैकी लोकप्रियता आहे, त्यांना बोलावून रोड शो केला जातो. रोड शो घेताना सर्वात प्रथम भरपूर गर्दी असलेला रस्ता निवडावा लागतो. हे म्हणजे बर्‍याच संघटनांचे अधिवेशने कधी पंढरपुरात, तर कधी थेट गोव्यात घेतली जातात. याचा उद्देश असा असतो की, संघटनेच्या सदस्यांना अधिवेशनाला येण्यासाठी काही ना काहीतरी अतिरिक्त आकर्षण असले पाहिजे.

संघटनेचे अधिवेशन अटेंड करता येईल आणि तसेच श्री विठ्ठलाचे दर्शन होईल, असा दुहेरी उद्देश समोर ठेवला तर अधिवेशनाला गर्दी होऊ शकते. गोव्यासारख्या ठिकाणी अधिवेशन घेतल्याने अधिवेशनामध्ये उपस्थिती भरपूर असेल; पण नोंदणी केल्यानंतर सदस्य अधिवेशनाकडे फिरकतील याची काही खात्री देता येत नाही. तसेच रोड शोच्याबाबत असते. शहरातील गजबज असलेला रस्ता निवडला तर ज्या रस्त्यावर भरपूर बागा किंवा सायंकाळी जनतेला फिरावयास येण्याचा मोह पाडणारी अनेक ठिकाणे असतात, म्हणजे रोड शो कधीही घेतला तरी दोन-तीन हजार लोक त्या परिसरात असतात. त्यामुळे रोड शोच्या वेळी आयतेच पब्लिक मिळते. इथे नेत्यांना भाषणे करायची नसतात किंवा कुठला प्रचार करायचा नसतो. केवळ हात हलवीत अभिवादन करायचे असते.

संबंधित बातम्या

या रोड शोसाठी सजवलेल्या वाहनामध्ये प्रत्यक्ष उमेदवार, त्याच्या बाजूला राष्ट्रीय नेता आणि आजूबाजूला राज्य पातळीवरील नेते आणि जागा उरली, तर इतर महत्त्वाचे कार्यकर्ते यांचा समावेश असतो. वाहन सजवलेले असते. त्यावर पक्षाची गाणी वाजत असतात. जागोजागी चिन्ह लावलेले असते आणि मग ही यात्रा जेव्हा निघते तेव्हा साधारणत: तासभर निवडणुकीचा माहोल तयार होतो. संध्याकाळच्या वेळी रोड शो असेल, तर चिन्ह हे प्रकाशमान केलेले असते आणि नेते ते हातामध्ये उंचावत मतदारांना संदेश देत असतात. मतदानाचे शेवटचे टप्पे सुरू असताना रोड शोमुळे निवडणूक आणखी रंगतदार झाली आहे. काही ना काही कारणास्तव गर्दी व्हावी आणि आपले चिन्ह लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आटापिटा केला जात आहे.

Back to top button