Chandrayan 3 : भारताने ‘Chandrayan 3’ लँडिंगसाठी दक्षिण ध्रुवच का निवडला? जाणून घ्या सविस्तर | पुढारी

Chandrayan 3 : भारताने 'Chandrayan 3' लँडिंगसाठी दक्षिण ध्रुवच का निवडला? जाणून घ्या सविस्तर

आज सायंकाळची 6 वाजून 4 मिनिटे… भारताचे चांद्रयान-3 (Chandrayan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल आणि त्याचवेळी खर्‍या अर्थाने भारत विश्वविक्रमादित्य ठरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील ही सर्वात आव्हानात्मक मोहीम आता अंतिम टप्प्यात आली असून, सर्वांना प्रतीक्षा आहे ती, यशस्वी, सफल लँडिंगची! चांद्रयान-3 (Chandrayan 3) चे यशस्वी लँडिंग कसे असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि म्हणूनच आजची सायंकाळ विशेष उत्कंठापूर्ण असणार आहे. सायंकाळची 6 वाजून 4 मिनिटे आणि सार्‍या नजरा सॉफ्ट लँडिंगवर! आजची सायंकाळ विशेष रम्य ठरावी, हीच सदिच्छा..!

पृथ्वीवरून चंद्र जितका सपाट दिसतो, तो तितका अजिबात नाही, ही वस्तुस्थिती आहे. चंद्राच्या भूभागावर मोठमोठाले खड्डे असून, त्यांना विवर असे संबोधले जाते. यातील काही विवर इतके प्रचंड मोठे आहेत की, त्या क्रेटरमध्येही आणखी बरेच क्रेटर सामावलेले आहेत आणि याचमुळे सॉफ्ट लँडिंग करणे आव्हानात्मक असते.

चंद्रावरील दक्षिण ध्रुव सर्वात कठीण भूभागापैकी एक मानला जातो. येथे लँडिंग अजिबात सहजसोपे असत नाही आणि म्हणूनच इस्रो यावेळी प्रत्येक पाऊल अतिशय जपून टाकत आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होण्यासाठी पिनपॉईंट नेव्हिगेशन गाईड, फ्लाईट डायनामिक्स, सपाट जागेची अचूक माहिती, योग्यवेळी थ्रस्टर कार्यान्वित होणे आणि योग्यवेळी त्याचा वेग कमी होणे अतिशय महत्त्वाचे असते. चंद्रावर कोणतेही यान उतरत असते, त्यावेळी ते एका अर्थाने पडत असते.

ज्यावेळी लँडर वेगळा होतो, त्यावेळी तो चंद्राच्या दिशेने पुढे पुढे सरकू लागतो. यादरम्यान खाली जाण्याची व योग्य दिशेने जाण्याची निर्धारित दिशा नियंत्रित असावी लागते. सॉफ्ट लँडिंगसाठी लँडरचा वेग प्रतिसेकंद तीन मीटरपर्यंत कमी करण्याची गरज असते. या वेगासाठी थ्रस्टर इंजिन सुरू केले जाते. आतापर्यंत चंद्रावर जे यान पाठवले गेले, ते उत्तर किंवा मध्य ध्रुवाच्या रोखाने होते. या भूभागातील जागा बर्‍यापैकी सपाट आहे आणि सूर्याचा प्रकाशही उत्तम असतो. दक्षिण ध्रुव मात्र चंद्रावरील अशी जागा आहे, जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. याचबरोबर या भूभागात मोठमोठाले दगड, मोठे क्रेटर आहेत. येथील सिग्नलदेखील कमकुवत असतो. त्यामुळेच, येथे सॉफ्ट लँडिंग अधिक आव्हानात्मक, अधिक कठीण ठरते.

हेही वाचा : 

 

Back to top button