

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाची ४७ वर्षांतील पहिली चांद्रयान मोहिम ( Russia Moon Mission) 'लुना-25'अपयशी ठरली आहे. याचा मोठा धक्का रशियाच्या ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ मिखाईल मारोव यांना बसला आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले असल्याचे वृत्त रशियातील प्रसार माध्यमांनी दिले आहे.
रशियाच्या लुना मोहिम अपयशी ठरल्यानंतर काही तासांनंतर रशियाचे ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ मिखाईल मारोव यांची प्रकृती खालावली. ते ९० वर्षांचे असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लूना-25 मोहिमेच्या अपयशामुळे त्यांना धक्का बसला आहे. "आम्ही चंद्रावर योग्यरित्या उतरू शकलो नाही, हे दुःखद आहे. माझ्यासाठी आमची चांद्रयान मोहिम सूरु करण्याची ही शेवटची संधी होती," असे त्यांनी म्हटलं आहे.
रशियन अंतराळ एजन्सी Roscosmos ने रविवारी (दि. २०) पुष्टी केली होती की, Luna-25 मोहिमेशी संपर्क तुटला आहे. रशियाचे लुना-२५ मिशन लँडिंगपूर्वी कक्षेत तांत्रिक बिघाडामुळे नियंत्रणाबाहेर गेले आणि अखेरीस चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले, असे रशियन अंतराळ संस्थेने म्हटले आहे. शनिवारीच रशियन स्पेस एजन्सीचा लुना-25 शी संपर्क तुटला होता. लुना-25 सोमवारी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होते.
भारताने 'चांद्रयान-3' मोहिमेपाठोपाठ सुमारे महिनाभराने म्हणजे शुक्रवार ११ ऑगस्ट रोजी रशियाकडून 'लूना-२५' हे चांद्रयान प्रक्षेपित करण्यात आले होते. दरम्यान, रशियन अंतराळ संस्था 'रॉसकॉसमॉस' या यानाने टिपलेले चंद्राचे छायाचित्र आपल्या टेलिग्राम चॅनेलवर शेअर केले होते. सुमारे पाच दिवस हे यान चंद्राभोवती फिरत राहील. त्यानंतर ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी आपला मार्ग बदलेल. मात्र मार्ग बदलतानाच ते चंद्रावर कोसळले. लुना-२५ ही रशियाची ४७ वर्षांतील पहिली चंद्र मोहीम होती. मात्र चंद्रावर हे यान कोसळ्याने रशियाची ही मोहिम (Russia's Luna-25) अयशस्वी ठरली आहे.
हेही वाचा :