BBC विरुद्ध ईडीची मोठी कारवाई; ‘फेमा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल | पुढारी

BBC विरुद्ध ईडीची मोठी कारवाई; 'फेमा' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन : अंमलबजावणी संचालनालयाने बीबीसी विरूद्ध मोठी कारवाई केली आहे. ईडीने बीबीसी विरुद्ध परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम १९९९ (फेमा) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ईडीने बीबीसी विरूद्ध परदेशी फंडातील अनियमिततेसाठी ही कारवाई केली आहे.

ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) गुरुवारी (दि. १३) बीबीसी इंडियाविरुद्ध कथित परकीय चलन उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ईडीने बीबीसीकडून काही कागदपत्रे मागविली असून, अधिकाऱ्यांना जबाब देण्यासाठी पाचारण केले आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात तपास संस्थांनी ईडीच्या दिल्ली तसेच मुंबईतील कार्यालयांवर छापेमारी करुन कागदपत्रांची पडताळणी केली होती.

बीबीसी इंडियाची क्षमता लक्षात घेतली तर कंपनीने दाखविलेली उलाढाल व फायदा यांचा ताळमेळ बसत नसल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने [सीबीडीटी] त्यावेळी सांगितले होते. विदेशातून आलेल्या पैशांवर कर भरण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरणही तेव्हा सीबीडीटीकडून देण्यात आले होते. बीबीसीने प्राप्त झालेला बराच पैसा विदेशात पाठविला असून तसे करताना ट्रान्सफर प्राईसिंग नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे आयकर खात्याचे म्हणणे आहे.

बीबीसीने गुजरातमधील २००२ च्या दंगलीवर एक लघुपट तयार केला होता. जानेवारीमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या या लघुपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर महिनाभराच्या आतच बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते.

यूके येथे मुख्यालय असलेले ब्रॉडकास्टर मीडीया कंपनी भारतीय तपास एजन्सीच्या तपासाखाली येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावर्षी फेब्रुवारीमध्ये, आयकर अधिकाऱ्यांनी भारतातील बीबीसी कार्यालयांची झडती घेण्यात आली होती. ‘भारतील गुजरात दंगल : द मोदी क्वेश्चन’ या माहितीपटावरून बीबीसी वादात अडकले होते, जो गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर टीका करणारा होता.

हेही वाचा:

Back to top button