जिद्दीला सलाम ! शेतात कांदा काढताना मिळाली पती पत्नीला आनंदाची बातमी; जोडीने एकाच वेळी झाले पोलिस भरती | पुढारी

जिद्दीला सलाम ! शेतात कांदा काढताना मिळाली पती पत्नीला आनंदाची बातमी; जोडीने एकाच वेळी झाले पोलिस भरती

पिंपरखेड(ता.शिरूर); पुढारी वृत्तसेवा : लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेत बरोबरीने पतीपत्नीने यश मिळवलेल्या अनेक घटना ऐकायला मिळतात. मात्र पोलिस भरतीत एकाचवेळी पती पत्नीने यशाला गवसणी घालत एकाच विभागात पोलिस होण्याचे भाग्य चांडोह येथील शेतकरी कुटुंबातील भाग्यश्री आणि तुषार शेलार या दाम्पत्याला लाभल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शेतात कांदा काढणीच्या वेळी ही आनंदवार्ता समजताच तुषारने भाग्यश्रीला उचलून आनंद साजरा केला.

चांहोड (ता. शिरूर ) येथील शेलार कुटुंबातील पती तुषार आणि पत्नी भाग्यश्री हे शेतकरी जोडपे एकाच वेळी पोलीस भरती झाले आहेत. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे दाम्पत्य एकाच वेळी भरती झाले आहे. काही झालं तरी पोलिस दलात भरती व्हायचंच या जिद्दीपोटी अथक प्रयत्न आणि कुटूंबाने प्रोत्साहन दिल्याने त्यांना आंनदाची बातमी समजली. अखेरची मेरिट लिस्ट लागल्याने त्यात प्राविण्य मिळवून या नवरा बायकोचा यात नंबर लागला. त्यावेळी या शेतकरी कुटूंबात आनंदाचे अश्रू पहावयास मिळाले.

चांहोड ( ता. शिरूर) येथे शेतकरी म्हतारबा शेलार यांचा मुलगा तुषार अन सुनबाई भाग्यश्री आहेत. म्हतारबा शेलार यांचे कुटूंब हे गावाच्या विकासासाठी झटणारे कुंटूंब आहे. आई कुसूम शेलार या पाच वर्ष सरपंच राहिल्या आहेत. त्यांचा गावच्या विविध विकास कामात त्यांचा सहभाग असतो. खेडे असणाऱ्या गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे काम त्यांनी केले. तुषारचे लग्न भाग्यश्री बरोबर २०२० मध्ये पार पडले.

फक्त पोलिस दलात भरती व्हायचे असा निश्चय तुषार आणि भाग्यश्रीने केला होता. त्यांना दोघांना पोलिस भरतीचे वेध लागले होते. त्यासाठी तुषार आणि भाग्यश्रीने बरोबरीने गेली चार वर्षे खुप कष्ट घेतले आहे. दररोजचा व्यायाम शिवाय घर आणि शेतातले काम याला फाटा देऊन या जोडप्याने फक्त पोलिस भरतीवर लक्ष ठेवले होते. दरम्यान, वेळप्रसंगी घरातील अडचणीवर मात करत कुटूंबाच्या खंबीर साथीने त्यांनी हे यश प्राप्त केले आहे.

कुटुंबातील सर्व सदस्यांचे पाठबळ, खंबीर साथ, आशिर्वाद, पाठीशी असल्याने एकाचवेळी पतीपत्नी म्हणून पोलिस भरतीत यश प्राप्त झाले. सामाजिक बांधिलकी जपत मिळालेल्या संधीचे यापुढील काळात सोने करण्यासाठी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया भाग्यश्री आणि तुषार शेलार या दाम्पत्याने दिली.

Back to top button