नागपुरात ५८ वर्षानंतर ‘मे’ महिन्यात सर्वाधिक पाऊस | पुढारी

नागपुरात ५८ वर्षानंतर 'मे' महिन्यात सर्वाधिक पाऊस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  ‘मे’ महिन्यातील कडक उन्हासाठी ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये गुरूवारी (दि.९) दमदार पाऊस झाला. जिल्ह्यात सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० पर्यंत सर्वाधिक ५०.०२ मि.मि.पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात ५८ वर्षानंतर मे महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला. आज (गुरूवारी ) सकाळी १० पासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली.

नागपूर जिल्ह्यात गुरुवारी (दि.९) हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. वादळीवाऱ्यासह गारपीटी व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आज (गुरूवारी ) दमदार पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील ओढे-नाले तुंडूंब वाहत होते. तर शहरातील काही घरात पावसाचे पाणी शिरले. दिवसभरात अधूनमधून पाऊस सुरूच होता.

दरम्यान, जिल्ह्यात १० ते १२ मे या कालावधीत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून या दिवशी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वादळीवारा व वीज गर्जनेची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आजच्या वादळी पावसाने दक्षिण नागपूरसह अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ठिकठिकाणी झाडे व पोल पडल्याच्या घटना घडल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button