‘खईके पान बनारस वाला’! बनारसी पान आणि लंगडा आंब्याला मिळाले GI मानांकन | पुढारी

'खईके पान बनारस वाला'! बनारसी पान आणि लंगडा आंब्याला मिळाले GI मानांकन

वाराणसी, पुढारी ऑनलाईन : वाराणसी येथील प्रसिद्ध बनारसी पान (Banarasi Paan) आणि बनारसी लंगडा आंबा (Banarasi Langda) यांना भौगोलिक मानांकन (GI tag) मिळाले आहे. याशिवाय, शेजारच्या चंदौली जिल्ह्यातील ‘आदमचिनी’ तांदूळ याला देखील हल्लीच जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. ३१ मार्च रोजी चेन्नईतील GI रजिस्ट्रीने एकाच दिवशी तब्बल ३३ उत्पादनांना जीआय प्रमाणपत्र दिले आहे. त्यात उत्तर प्रदेशातील १० उत्पादानांचा समावेश आहे. तर यातील तीन उत्पादने वाराणसीतील आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेशातील ४५ उत्पादनांना जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. त्यात उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील वाराणसी भागातील २० उत्पादनांचा समावेश आहे. आतापर्यंत, ४४१ भारतीय उत्पादने आणि ३४ परदेशी वस्तूंना GI रजिस्ट्रीद्वारे GI टॅग देण्यात आला आहे.

पान आणि आंब्या व्यतिरिक्त वाराणसीचे आणखी एक प्रसिद्ध शेतपीक उत्पादन रामनगर भंटा (वांगी) यालाही जीआय प्रमाणपत्र मिळाले आहे. आत्तापर्यंत वाराणसी शहर प्रामुख्याने GI मानांकन प्राप्त हातमाग आणि हस्तकला वस्तूंसाठी ओळखले जात होते. आता बनारसी पान आणि बनारसी लंगडा आंबा याला जीआय मानांकन मिळाले आहे.

Banarasi Paan : खईके पान बनारस वाला…

‘खईके पान बनारस वाला…’ हे डॉन चित्रपटातील गाणे आजही लोकप्रिय आहे. ते आजही लोकांच्या ओठावर आहे. या गाण्याचे बोल आणि अमिताभ बच्चन यांच्या डान्सने त्यावेळी धमाल केली होती. या गाण्यात ज्या बनारसी पानाचा उल्लेख आहे त्याला आजा GI मानांकन मिळाले आहे. बनारसी पान त्याच्या गोडव्यासाठी प्रसिद्ध आहे.

जीआय मानांकन म्हणजे काय?

जे उत्पादन एका विशिष्ट भागात घेण्यात येत असेल आणि त्याची एक विशिष्ट प्रकारची ओळख असेल तर त्याला जीआय म्हणजेच भौगोलिक मानांकन देण्यात येते. एखाद्या उत्पादनाला जीआय मानांकन मिळाल्यानंतर त्या उत्पादनाचे मूळ स्थान निश्चित होते. तसेच उत्पादकाला त्याचे अनेक अधिकार प्राप्त होतात. त्या उत्पादनाची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी भौगोलिक मानांकन असणे महत्त्वाचे असते. दार्जीलिंग चहा आणि बासमती तांदूळ या भारताच्या दोन लोकप्रिय भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांना जगभरातल्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

लंगडा आंबा हे नाव कसे पडले?

लोक उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात. कारण या सिझनमध्ये निरनिराळ्या प्रकारचे आंबे खायला मिळतात. तुमच्या माहितीसाठी भारतात तब्बल दीड हजार प्रकारच्या आंब्यांची शेती केली जाते. या सर्वच आंब्यांची चव वेगवेगळी असते. त्यातच आपल्याकडे हापूस, लंगडा आंबा, बदामी आंबा, केशर आंबा लोकप्रिय आहेत. यातील लंगडा आंबा हा अनेकांना त्याच्या नावामुळे थोडा वेगळा वाटतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या आंब्याला असे नाव का बरे दिले गेले असेल किंवा पडले असेल?

पद्मश्री हाजी कलीमुल्लाह यांनी लंगडा आंब्याबद्दल सांगतात की, साधारण अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वी बनारसच्या काशीमध्ये लंगडा आंब्याची शेती सुरू करण्यात आली होती. बनारसमध्ये एका पायाने दिव्यांग व्यक्ती राहात होती. त्याला त्याच्या जवळचे लोक प्रेमाने लंगडा म्हणून हाक मारायचे. एकदा एक आंबा या व्यक्तीने खाल्ला आणि त्याला तो खूपच आवडला. या आंब्याची कोय त्याने अंगणात लावली. काही वर्षांनी या झाडाला भरपूर आंबे येऊ लागले. ते फारच स्वादिष्ट होते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नावावर सर्वांनी मिळून या आंब्याचे नाव लंगडा आंबा ठेवले. भारतात अनेक ठिकाणी लंगडा आंब्याचे उत्पादन घेतले जाते. पण बनारसमधील लंगडा आंब्याची चवच निराळी आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button